विधानसभेत पोलिसांकडून आमदारांना झालेल्या मारहाणीचे मुख्यमंत्री नितीशकुमारांनी केले समर्थन

विशेष सशस्त्र पोलीस विधेयकावरून बिहार विधानसभेत राडा झाला होता. या प्रकरणी मुख्यमंत्री नितीशकुमारांनी समर्थन करणारी भूमिका घेतली आहे.
bihar cm nitish kumar says speaker decides about house proccedings
bihar cm nitish kumar says speaker decides about house proccedings

पाटणा : विशेष सशस्त्र पोलीस विधेयकावरून बिहार विधानसभेत जोरदार राडा झाला होता. या विधेयकाला विरोध करणाऱ्या आमदारांना सुरक्षारक्षकांनी मारहाण करीत फरफटत विधानभवनाबाहेर काढले होते. महिला आमदारांनाही सभागृहाबाहेर ओढत आणल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला असताना मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मात्र याचे समर्थन केले आहे. 

विधानसभेतील कालच्या प्रकारानंतर बिहार सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. बिहारच्या इतिहासातील काळा दिवस असे वर्णन विरोधकांकडून केले जात आहे. राज्याच्या विधानसभेत पोलिसांनी आमदारांना मारहाण केल्याचा प्रकार आतापर्यंत कधीच घडला नव्हता. मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोधकांनी या मुद्द्यावर लक्ष्य केले आहे. 

याला उत्तर देताना नितीशकुमार म्हणाले की, अध्यक्षांच्या दालनाला घेराव घालण्यात आला होता. त्यांच्या आसनासमोरही गोंधळ घालण्यात आला. आज तुम्ही म्हणता की पोलीस बोलावले. परंतु, हे सर्व अध्यक्षांच्या हातात असते. सभागृहातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ते कोणतीही मदत घेऊ शकतात. 

बिहार विधानसभेत काल (ता.23) विशेष सशस्त्र पोलीस विधेयक मंजुरीसाठी सादर करण्यात आले. या विधेयकाला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने सुरूवातीपासूनच विरोध केला आहे. हे विधेयक मंजुरीसाठी सादर केल्यानंतर विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यासह आमदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. विधेयक मंजुरीआधी विरोधी आमदार थेट अध्यक्षांच्या आसनाजवळ पोहचले. त्यांच्या हातातून विधेयक ओढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.  तेजस्वी यादव यांनी हे विधेयक फाडल्याने सत्ताधारी आमदारांनीही विरोध करण्यास सुरूवात केली.

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ निर्माण झाल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले. विरोधी आमदारांनी अध्यक्षांना घेराव घातल्याने पोलिसांनी आमदारांना मारहाण करून बाजूला केले. पोलिसांकडून आमदारांना फरफटत बाहेर काढण्यात आले. महिला आमदारांच्या केसांना धरून त्यांना ओढले जात असल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. या झटापटीत काही आमदार जखमीही झाल्याचे समजते. 

दरम्यान, या गदारोळानंतर विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधकांनी लोकशाहीच्या मर्यादा ओलांडल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे. तर विरोधी आमदारांनी नीतिश कुमार यांच्या आदेशावरूनच आमदारांना मारहाण केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बिहारमधील राजकीय वातावरण तापले असून आरजेडीचे आमदार आक्रमक झाले आहेत. 

काय आहे विधेयक?

बिहारमध्ये अजूनही बिहार मिलिटरी पोलीस नावाचे दल आहे. मिलिटरी हा शब्द कोणत्याही राज्याच्या पोलीस दलाला नसते. मिलिटरी हा शब्द हटविणे हा या विधेयकाचा उद्देश आहे. विशेष सशस्त्र पोलिसांचे काम सरकारी संस्थांमधील सुरक्षा करणे हे असल्याचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी सांगितले. पण या दलाकडे कोणचीही तपासणी करण्याचा किंवा अटक करण्याचा अधिकार नाही. या विधेयकामुळे हे अधिकार मिळणार आहेत. तर या अधिकारांमुळे पोलिस कुणाचीही घरात थेट घुसून तपासणी करतील, अटक करतील असा आरोप विरोधकांनी केला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com