भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर भारत बायोटेककडून लस पुरवठ्याचा करार रद्द - Bharat Biotech terminate its MOU with two companies to sell COVAXIN in Brazil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर भारत बायोटेककडून लस पुरवठ्याचा करार रद्द

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 जुलै 2021

भारत बायोटेककडून कोव्हॅक्सीन ही कोरोना प्रतिबंधात्मक लस तयार करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : भारतातील भारत बायोटेक या लस उत्पादक कंपनीकडून ब्राझीलला लस पुरवठा केला जाणार होता. त्यासाठी तेथील दोन कंपन्यांशी तब्बल 2 हजार 412 कोटी रुपयांचा करार केला होता. या करारावरून ब्राझीलमध्ये मोठं राजकारण सुरू झालं. त्याचा फटका भारत बायोटेकला बसला असून भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर हा करार रद्द करण्यात आला आहे. (Bharat Biotech terminate its MOU with two companies to sell COVAXIN in Brazil)

भारत बायोटेककडून कोव्हॅक्सीन ही कोरोना प्रतिबंधात्मक लस तयार करण्यात आली आहे. भारतात या लशीचे डोस मोठ्या प्रमाणावर उत्पादित केले जात आहेत. भारतासह अन्य काही देशांनाही लस पुरवठा करण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याअनुषंगाने ब्राझीलमधील प्रेसिया मेडिकेमेन्टॉस आणि एनव्हिक्सिआ फार्मास्युटिकल्स या दोन कंपन्यांशी करार करण्यात आला होता. या कंपन्यांमार्फत ब्राझीलमध्ये कोव्हॅक्सिन लशीच्या सुमारे दोन कोटी डोसची विक्री व वितरण केले जाणार होते. 

हेही वाचा : खडसेंचा अपमान करण्याची ताकद आमच्यात नव्हती; बावनकुळे यांचं वक्तव्य

या करारावरून ब्राझीलमध्ये मोठे राजकारण सुरू झाले होते. कराराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळं हा करार रद्द करण्यात आला आहे. दोन्ही कंपन्या ब्राझीलमध्ये भारत बायोटेकच्या पार्टनर आहेत. नियामक मंडळाकडे सादरीकरण, परवाना, वितरण, विमा, तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांसाठी मदत यासाठी सहकार्य करत आहेत. 

करार रद्द करण्याबाबत भारत बायोटेकने सांगितले की, ''कंपनीने तत्काळ करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतरही भारत बायोटेककडून ब्राझिलमधील औषध नियामक संस्था (ANVISA) सोबत कोव्हॅक्सिनसाठीची नियामक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले जातील." भारत बायोटेककडून मागील वर्षी 20 नोव्हेंबर रोजी करार करण्यात आला होता. 

दरम्यान, कोव्हॅक्सिन ही भारतातील एकमेव स्वदेशी लस आहे. अन्य देशांमध्ये लशीचे वितरण करण्यासाठी स्थानिक नियामक संस्थांची परवानगी घेण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न केले जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मान्यतेसाठीही कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. ही मान्यता मिळाल्यास कोव्हॅक्सिन लशीचा इतर देशांत पुरवठा करणे कंपनीला सहज शक्य होणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख