बंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी सात आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदाची गुड न्यूज दिली आहे. या मंत्रिमंडळावरुन मोठा गदारोळ सुरू झाला असून, भाजपच्या काही आमदारांनी उघड बंडाची भाषा सुरू केली आहे. ब्लॅकमेलिंगद्वारे आणि पैसे घेऊन मंत्रिपदाचे वाटप सुरू असल्याचा खळबळजनक आरोप माजी केंद्रीय राज्यमंत्री व विद्यमान आमदार बसनगौडा पाटील-यतनाळ यांनी केला आहे.
कर्नाटकातील मंत्रिमंडळ विस्ताराचे भिजत घोंगडे मागील वर्षभरापासून कायम होते. यामुळे अनेक नेते नाराज होते. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले नेते अस्वस्थ झाले असून, ते मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि सरकारला लक्ष्य करीत होते. सध्या मंत्रिमंडळात 27 मंत्री असून, एकूण क्षमता 34 पर्यंत वाढवता येऊ शकते.
गरज सरो वैद्य मरो...मुख्यमंत्र्यांनी अपक्ष आमदाराचे कॅबिनेट मंत्रिपद काढून...
अखेर मंत्रिमंडळ विस्तार येडियुरप्पांनी आज जाहीर केला. त्यांनी म्हटले आहे की, एमटीबी नागराज, उमेश कत्ती, अरविंद लिंबावली, मुरूगेश निरानी, आर. शंकर, सी.पी.योगेश्वर, अंगारा एस. यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. ते आजच मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या नव्या मंत्र्यांच्या नावांची यादी राज्यपालांना पाठवण्यात आली आहे. त्यांचा शपथविधी दुपारी 3.30 वाजता होईल.
येडियुरप्पांनी अखेर सात आमदारांना दिली 'गुड न्यूज'!
नव्याने मंत्रिमंडळात समावेश होणाऱ्या आमदारांमध्ये काँग्रेस आणि जेडीएस सोडून भाजपमध्ये आलेल्या एम.टी.बी.नागराज आणि आर.शंकर यांचा समावेश आहे मात्र, मुनिरत्न यांचा समावेश नाही. याचवेळी येडियुरप्पांनी अपक्ष आमदार आणि उत्पादन शुल्क मंत्री एच.नागेश यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला आहे. त्यांच्या जागा भरणार की नाही हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
आमदार यतनाळांनी मुख्यमंत्री येडियुरप्पांची लायकी काढली अन्...
मंत्रिमंडळ विस्तारावरुन भाजपमध्ये अनेक आमदारांना बंडाचे निशाण फडकावले आहे. यात आमदार बसनगौडा पाटील-यतनाळ आघाडीवर आहेत. त्यांनी म्हटले आहे की, येडियुरप्पा यांनी आता राजकीय संन्यास घ्यावा. ब्लॅकमेल करणारे आणि पैसे देणारे अशांना मंत्रिपद देण्यात येत आहे. मंत्रिपदासाठी आता ब्लॅकमेलिंगची सीडी आणि पैसा असे दोन कोटा आहेत. येडियुरप्पा यांना सीडीच्या माध्यमातून ब्लॅकमेल केले जात आहे.
भाजपचे आमदार कालाकप्पा बंदी यांनीही पक्षाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी पक्षाचा निष्ठावंत सेवक आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर मी अजिबात समाधानी नाही. याकडे पक्षाने लक्ष द्यायला हवे.
Edited by Sanjay Jadhav

