पंतप्रधान मोदींकडे सोळा दिवसांपूर्वीच पोहचला होता येडियुरप्पांचा राजीनामा 

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती.
B S yediyurappa resigned before 16 days ago
B S yediyurappa resigned before 16 days ago

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी सोमवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. पण त्यांच्या राजीनाम्यावरून आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. येडियुरप्पा यांचा राजीनामा 10 जुलै रोजीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं गेला होता, अशी माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळं त्यांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स अजूनच वाढला आहे. (B S yediyurappa resigned before 16 days ago)

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली. यानंतर येडियुरप्पा तातडीने राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला गेले होते. तिथे त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी येडियुरप्पांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यांनी येडियुरप्पांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नेमणूक केली आहे. नवीन मुख्यमंत्र्यांची निवड होईपर्यंत येडियुरप्पा राज्याची धुरा सांभाळत आहेत.

राजीनाम्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याबाबतची नवीन माहिती समोर आली आहे. त्यांनी 10 जुलै रोजीच राजीनामा दिला होता. त्यांच्या अत्यंत जवळच्या नेत्याने राजीनाम्याचे पत्र त्याचदिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहचवलं होतं. येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या बैठकीत त्यांनी राजीनाम्यासाठी काही वेळ मागितला होता. मुख्यमंत्री म्हणून स्वातंत्र दिनी ध्वजवंदन करण्याची त्यांची इच्छा होती. 

येडियुरप्पा यांनी दिल्ली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली होती. या बैठकांनंतर येडियुरप्पा यांनी राजीनाम्याची चर्चा झाली नसल्याचा दावा केला होता. त्या दिवसानंतर येडियुरप्पा पक्षाकडून अद्याप कोणतीही सुचना आली नसल्याचे सांगत होते. पक्ष जेव्हा सांगेल त्यावेळी राजीनामा देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केलं होतं. येडियुरप्पा राजीनामा देणार, ही जोरदार चर्चा सुरू असतानाच सोमवारी त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. 

दरम्यान, येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर भाजप नेतृत्वाने पुढील मुख्यमंत्री ठरवण्यासाठी पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी.किशन रेड्डी यांनी नेमले आहे. दोघेही केंद्रीय निरीक्षक बंगळूरमध्ये दाखल झाले असून आमदारांची बैठक घेत आहेत. नवीन मुख्यमंत्र्यांनी सर्वतोपरी पाठिंबा देण्याचे येडियुरप्पांनी आधीच जाहीर केले आहे. येडियुरप्पांचा पक्ष संघटनेतील प्रभाव पाहता येडियुरप्पांकडून नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाला संमती घेतली जाईल. येडियुरप्पांना राजीनामा देण्यास भाग पाडल्यामुळे सरकारसह पक्ष संघटनेत नाराजीचे वातावरण आहे. यामुळे पक्ष नेतृत्वाने सावधपणे पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com