येडियुरप्पा अन् कुमास्वामी एकत्र येऊन काँग्रेसला देणार धक्का

कर्नाटकात मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि कुमारस्वामी पुन्हा एकत्र आल्याने चर्चेला उधाण आले आहे. दोघे मिळून काँग्रेसला धक्का देणार आहेत.
b s yediyurappa and h d kuamaraswamy will take on congress in karnataka
b s yediyurappa and h d kuamaraswamy will take on congress in karnataka

बंगळूर : कर्नाटकातील सत्ताधारी भाजपचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा आणि माजी मुख्यमंत्री व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) नेते एच.डी.कुमारस्वामी हे पुन्हा एकत्र आले आहेत. येडीयुरप्पा आणि कुमारस्वामी यांच्या एकत्र येण्याने राज्यात नवीन समीकरणे उदयास येऊ शकतात, अशी चर्चा जोर धरु लागली आहे. दोन्ही नेते काँग्रेसला धक्का देण्यासाठी एकत्र आले आहेत. 

कर्नाटक विधान परिषदेच्या सभापतिपदी काँग्रेसचे नेते प्रतापचंद्र शेट्टी हे आहेत. त्यांच्याविरोधात भाजपकडून अविश्वास ठराव आणला जाणार आहे. याला जेडीएसने पाठिंब्या देण्याची भूमिका घेतली आहे. शेट्टी यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्यास काँग्रेसला हा मोठा धक्का बसणार आहे. 

अविश्वास ठरावाला जेडीएसने पाठिंबा दिला असला तरी या बदल्यात ते पद मागितले आहे. शेट्टी यांच्या विरोधातील ठराव मंजूर झाल्यास या जागेसाठी निवडणूक होईल. या जागेसाठी जेडीएसचे नेते बसवराज होराट्टी यांचे नाव आघाडीवर आहे. जेडीएस अविश्वास ठरावाला पाठिंबा देणार असल्याने होराट्टी यांना भाजपकडून पाठिंबा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

राज्यातील 2018 च्या  विधानसभा निवडणुकीनंतर जेडीएसने भाजपला पाठिंबा देण्यास नकार देऊन काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली होती. यानंतर वर्षभराने काँग्रेस आणि जेडीएसमधील अनेक आमदार फुटून भाजपमध्ये दाखल झाले होते. यानंतर कर्नाटकात 2019 मध्ये भाजप सत्तेवर आला होता. यानंतर अनेक वेळा येडियुरप्पांच्या मदतीला कुमारस्वामी धावून आल्याचे दिसले आहे. 

दरम्यान, आज कर्नाटक विधान परिषदेच्या उपसभापतिपदी भाजपचे एम.के.प्राणेश यांनी निवड झाली. जेडीएसच्या पाठिंब्यावर ही निवड झाली आहे. कारण विधान परिषदेत भाजप, जेडीएस अथवा काँग्रेस या तिन्हीपैकी एकाही पक्षाला बहुमत नाही. जेडीएस नेते एस.एल.धर्मेगौडा यांच्या संशयास्पद आत्महत्येमुळे ही जागा रिकामी झाली होती. 

कर्नाटक विधान परिषदेचे सभापती व काँग्रेस नेते प्रतापचंद्र शेट्टी यांना भाजपने आक्षेप घेतला होता. त्यावेळी उपसभापती असलेले धर्मेगौडा कामकाज सांभाळत होते. काँग्रेस सदस्यांनी त्यावेळी झालेल्या गोंधळात धर्मेगौडा यांना खुर्चीवरून खाली ओढले होते.  

येडीयुरप्पा आणि कुमारस्वामी एकत्र आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या एकत्र येण्यामुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. येडीयुरप्पा आणि भाजप नेतृत्वाचे संबंध मागील काही काळापासून ताणलेले आहेत. मात्र, राज्यात येडीयुरप्पा यांना डावलणे शक्य नसल्याने भाजप नेतृत्वाची कोंडी झाली आहे. येडीयुरप्पा यांच्यावर पदावरुन पायउतार होण्यासाठी दबाव आणल्यास ते नवीन पक्ष स्थापन करु शकतात, अशी चर्चा मागील काही काळापासून सुरू आहे. यासाठी ते जेडीएसची मदत घेऊ शकतात, अशीही चर्चा सुरू आहे. 

Edited by Sanjay Jadhav 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com