अविश्वास प्रस्ताव, नाकारलेलं गोपनीय मतदान अन् विरोधकांचं वाढलेलं संख्याबळ...

हरियानातील भाजप सरकारविरोधात काँग्रेसने आणलेला अविश्वास प्रस्ताव अखेर नामंजूर झाला आहे. मात्र, विरोधकांचे संख्याबळ वाढले आहे.
B S Hooda says had there been secret voting results would have been different
B S Hooda says had there been secret voting results would have been different

चंडीगड : हरियानातील मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखील भाजप सरकार अखेर तरले आहे. काँग्रेसने भाजप सरकारविरोधात विधानसभेत आणलेला अविश्वास प्रस्ताव नामंजूर झाला आहे. सरकारच्या बाजूने 55 तर विरोधात 32 सदस्यांनी मतदाने केले. या प्रस्तावानंतर विरोधकांचे संख्याबळ आता 30 वरुन 32 वर गेले आहे. यानंतर काँग्रेस नेते भूपिंदरसिंह हूडा यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.  

शेतकरी आंदोलनाचे निमित्त साधून हरियानातील भाजप सरकारविरोधात विधानसभेत अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हूडा यांनी काही दिवसांपूर्वीच ही घोषणा केली होती. सरकारला पाठिंबा दिलेले दोन आमदार सरकारमधून बाहेर पडले आहेत. काही आमदारांनी हे सरकार सर्वाधिक भ्रष्टाचारी असल्याची टीका केली आहे. सरकारने लोकांचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे आम्ही अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतल्याचे हूडा यांनी सांगितले होते.

त्यानुसार आज विधानसभेत काँग्रेसकडून अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला. हरियानामध्ये विधानसभेचे एकूण ९० सदस्य आहेत. सध्या 88 सदस्य असून, बहुमतासाठी ४5 आमदारांची गरज होती. भाजपकडे ४० आमदार असून, त्यांनी जननायक जनता पक्षाच्या (जेजेपी) १० आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले आहे. पाच अपक्षांचाही सरकारला पाठिंबा आहे. यामुळे खट्टर सरकारने विश्वास प्रस्ताव जिंकला आहे. 

अविश्वास प्रस्ताव नामंजूर झाल्यानंतर हूडा यांनी सरकावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, सरकार आता उघडे पडले आहे. त्यांनी व्हीप जारी केल्याने सरकारला बहुमत मिळेल, असे मी आधीच जाहीर केले होते. मी विधानसभा अध्यक्षांना गुप्त मतदान घेण्याची विनंती केली होती. गुप्त मतदान झाले असते तर परिस्थिती वेगळी दिसली असती. तरीही आमचे संख्याबळ आता 30 वरुन 32 वर गेले आहे. 

सरकारने कोणत्याही मुद्द्यावर समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत. सरकार आधीच लोकशाही गमावून बसले आहे. आम्ही जनतेचा आवाज उठवत राहू आणि त्यांच्यासाठी लढत राहू. सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढावा, अशीच आमची मागणी आहे, असे हूडा यांनी सांगितले. 

जननायक पक्षाचे प्रमुख दुष्यंत चौटाला हे उपमुख्यमंत्री आहेत. राज्यात काँग्रेसचे ३१ आमदार आहेत. शेतकरी आंदोलनावरून चौटाला यांनी यापूर्वीच सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. तसेच भाजपमधीलही काही आमदार नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे खट्टर सरकारसमोरील अडचणी वाढल्या होत्या.. 

अविश्वास प्रस्ताव आणला जाणार असल्याने भाजपसह काँग्रेस व जननायक पक्षानेही आमदारांना व्हीप काढला होता. आज विधानसभेच्या संपुर्ण कामकाजावेळी आमदारांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. नेत्यांच्या परवानगीशिवाय त्यांना सभागृह सोडता येणार नाही, असे भाजपने म्हटले होते. जननायक पक्षाचे आमदार सरकारच्या बाजून उभे राहतील, असे पक्षाचे नेते अमरजीत धांडा यांनी स्पष्ट केले होते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com