धक्कादायक : जिल्हा न्यायाधीशांची मॉर्निंग वॉक करताना हत्या 

न्यायाधीश उत्तम आनंद यांची हत्या करण्यात आली आहे.
Auto rickshaw hit District Judge Uttam Anand in Dhanbad
Auto rickshaw hit District Judge Uttam Anand in Dhanbad

धनबाद : जिल्हा न्यायाधीश नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक करत असताना मागून आलेल्या रिक्षाने त्यांना जोरदार धडक दिली. सुरूवातीला हा अपघात असल्याचे आजुबाजूच्या लोकांसह पोलिसांनाही वाटले. पण सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेज पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. एका रिक्षाने जाणीवपूर्वक त्यांना धडक दिल्याचे स्पष्ट झाल्याने संपूर्ण न्यायव्यवस्था हादरून गेली आहे. (Auto rickshaw hit District Judge Uttam Anand in Dhanbad)

झारखंडमधील धनबाद येथील ही घटना असून न्यायाधीश उत्तम आनंद यांची हत्या करण्यात आली आहे. ते धनबादचे जिल्हा न्यायाधीश होते. ही घटना बुधवारी सकाळी घडली असून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करण्यास विलंब केल्याने सुरूवातीला या घटनेचे गांभीर्य समोर आलं नव्हतं. घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर रिक्षाने उत्तम आनंद यांना धडक दिली.

उत्तर आनंद हे पहाटे पाच वाजता मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. ते रस्त्याचे कडेने चालत होते. त्याचवेळी काही अंतरापर्यंत रस्त्याच्या मधून जाणारी रिक्षा न्यायाधीशांच्या जवळ आल्यानंतर अचानक त्यांच्या दिशेने वळते आणि थेट त्यांना धडक देऊन पुढे निघून जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून आले आहे. हत्येच्या उद्देशानेच रिक्षा धडकवण्यात आल्याचे स्पष्ट झालं आहे. 

उत्तर आनंद हे रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे एका व्यक्तीने पाहिले. त्यानेच त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही तास त्यांची ओळखच पटली नाही. सकाळचे सात वाजले तरी ते घरी न परतल्याने कुटूंबियांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी शोधाशोध केल्यानंतर रुग्णालयात अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीची माहिती मिळाली. 

पोलिस व कुटूंबियांनी ओळख पटवल्यानंतर हा मृतदेह उत्तम आनंद यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. सुरूवातीला हा अपघात असल्याची शक्यता पोलिसांनीही व्यक्त केली. त्यानुसार पुढील प्रक्रियाही सुरू झाली. पण सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर याचा उलगडा झाला. अखेर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत शोध सुरू केला. दरम्यान, पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास करण्यास विलंब केल्याने उच्च न्यायालयानेही ताशेरे ओढले आहेत. 

उत्तम आनंद यांच्या हत्येनंतर संपूर्ण न्यायव्यवस्थाच हादरून गेली आहे. सर्वोच्च न्यायालयातील बार असोसिएशनने हा मुद्दा सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्यासमोर उपस्थित केला. यावेळी त्यांनी झारखंडच्या मुख्य न्यायमूर्तींशी चर्चा केल्याचे सांगितले. आता हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. याची आम्ही दखल घेतली असल्याचे रमणा यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com