सिरम अडचणीत? अॅस्ट्राझेनेका कंपनीने बजावली कायदेशीर नोटीस - astrazeneca company send notice to semrum for delay in vaccine | Politics Marathi News - Sarkarnama

सिरम अडचणीत? अॅस्ट्राझेनेका कंपनीने बजावली कायदेशीर नोटीस

वृत्तसंस्था
बुधवार, 7 एप्रिल 2021

जगातील अनेक देशांना लस मिळण्यास विलंब होत आहे. यावरुन अॅस्ट्राझेनेका कंपनीने सिरमला कायदेशीर नोटीस बजावली आहे. 
 

नवी दिल्ली : देशात कोरोना लशीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी आधी भारतीयांना ही लस देण्याची भूमिका घेतली आहे. भारतातील परिस्थितीचा विचार करुन दोन महिन्यानंतर पुन्हा निर्यातीचा विचार करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे जगातील अनेक देशांना लस मिळण्यास विलंब होत आहे. यावरुन अॅस्ट्राझेनेका कंपनीने सिरमला कायदेशीर नोटीस बजावली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

सिरम ही जगातील सर्वांत मोठी लस निर्यातदार कंपनी आहे. अॅस्ट्राझेनेका कंपनी आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने विकसित केलेल्या कोव्हिशिल्ड लशीचे उत्पादन सिरम करीत आहेत. अनेक देश कोरोना लशीसाठी सिरमवर अवलंबून आहेत. परंतु, देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी सिरमला लशीची निर्यात थांबवावी लागणार आहे. याचा फटका अनेक देशांतील कोरोना लसीकरणाला बसणार आहे. या लशीच्या निर्यातीसंदर्भात अनेक देशांशी करार झाले आहेत. आता अनेक देशांना ही लस मिळण्यास विलंब होत असल्याने अॅस्ट्राझेनेकाने सिरमला कायदेशीर नोटीस बजावली आहे, असे वृत्त 'एनडीटीव्ही'ने दिले आहे. 

देशभरात आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूचे आकडे विक्रमी पातळीवर गेली आहे. देशातील रुग्णसंख्या मागील 24 तासांत 1 लाख 15 हजारांवर गेली आहे. याचबरोबर कोरोनाने होणारे मृत्यूही वाढले आहेत. देशात लशीचा तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात लशीच्या टंचाईमुळे अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वच प्रौढ नागरिकांना कोरोना लस द्यावी, अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली होती. यावर आरोग्य मंत्रालयाने लशीचा तुटवडा असल्याचे कारण देत गरज असेल त्यांनाच प्रथम लस देण्याची भूमिका घेतली आहे. वेळ आल्यानंतर सर्वांना लस देण्यात येईल, असेही म्हटले होते. 

या पार्श्वभूमीवर बोलताना अदर पूनावाला म्हणाले आहेत की, भारतात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. यामुळे पुढील दोन महिने देशातील मागणी पूर्ण करण्यावर भर राहणार आहे. देशातील रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर दोन महिन्यांनी जूनमध्ये लशीची निर्यात सुरू करण्याचा विचार करण्यात येईल. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. 

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली. तिसऱ्या टप्प्यात १ एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. 

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख