आसामने आवळल्या मिझोरामच्या नाड्या; जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा रोखला - assam starts economic blockade of mizoram after border clash-sj84 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

भाजपचे किरीट सोमय्या अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना
चरणजीत चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री राज्याचे प्रभारी हरीश रावत यांची घोषणा
गणेशोत्सव विसर्जनामुळे पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद
अंबिका सोनी यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद नाकारले
पुरग्रस्तांसाठी सरकारची महत्वाची घोषणा ; नव्या निकषानुसार मदत

आसामने आवळल्या मिझोरामच्या नाड्या; जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा रोखला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 जुलै 2021

आसाम- मिझोराम सीमेवरील तणाव अद्याप कायम आहे. सीमेवरील वादामुळे दोन्ही राज्यांमध्ये जुंपली आहे. 

सिल्चर : आसाम- मिझोराम सीमेवरील (Assam-Mizoram Border) तणाव अद्याप कायम आहे. सीमेवरील वादामुळे दोन्ही राज्यांमध्ये जुंपली आहे. आता आसामने (Assam) मिझोरामची (Mizoram) कोंडी करण्यास सुरवात केली आहे. मिझोरामला होणारा अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा रोखून आर्थिक कोंडी करण्यास आसामने सुरवात केली आहे. यामुळे हा तिढा आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. 

आसामच्या बराक खोऱ्यात वाहनांची अडवणूक होत आहे. त्यामुळे मिझोरामला फटका बसू लागला आहे. खाद्यतेल, स्वयंपाकाचा गॅस, तांदूळ आणि इतर जीवनावश्‍यक वस्तू त्रिपुरामार्गे मिझोराममध्ये आणल्या जात आहेत. याबाबत बोलताना मिझोरामचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याचे मंत्री के. लालरिनलिना म्हणाले की, सरकारने त्रिपुरातून पेट्रोल आणि डिझेल आणायला सुरुवात केली आहे. काही तेलाचे टँकर हे शुक्रवारी त्रिपुरातून ऐजॉल येथे दाखल होतील. तसेच, सात टँकर हे आगरतळावरून येणार आहेत. 

आसाम-मिझोराम या राज्यांतील सीमा असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३०६ वर निमलष्करी दलाच्या जवानांची गस्त आहे. आसामने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या नागरिकांना मिझोराममध्ये जाऊ नका, असा सल्ला दिला आहे. आंदोलनाचे केंद्र बनलेल्या आसामच्या बराक खोऱ्यातील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे.  सीमेवर 26 जुलैला झालेल्या संघर्षानंतर या भागात तणाव निर्माण झाला होता. याचा फटका सार्वजनिक वाहतुकीला बसला होता. शेजारील राज्यांमध्ये जाणारे अनेक ट्रक हे रस्त्यांवरच अडकून पडले होते. या काळात अनेक मालवाहू गाड्यांनी त्रिपुरामार्गे मिझोराममध्ये जाण्याचा पर्याय स्वीकारला आहे. 

आसाम -मिझोराम सीमेवर 26 जुलैला झालेल्या हिंसाचारात आसाम पोलीस दलाचे सहा जवान मृत्यूमुखी पडले होते तर 45 हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेमुळे  देशभरात खळबळ उडाली होती. आसाम-मिझोराम सीमेवरील स्थितीवर केंद्रीय गृह मंत्रालय नजर ठेवून आहे. सीआरपीएफच्या तुकड्या सीमेवर तैनात करण्यात आल्या आहेत. दोन्ही राज्यांतील पोलिसांत संघर्ष होऊ नये, यासाठी या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालयाने दोन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांना दिल्लीत बोलावून घेतले होते. त्यांना शांतता कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पुन्हा सीमेवर तणाव निर्माण होऊ नये म्हणून केंद्र सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. 

हेही वाचा : खासदाराच्या चौकशीसाठी पोलिसांनी ठोठावला संसदेच्या दरवाजा 

गृहमंत्री अमित शहा नुकतेच ईशान्य भारतातील राज्यांच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर दोनच दिवसांत आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांमधील वाद चिघळला आहे. मिझोराममधील ऐजॉल, कोलाबिस आणि मामित तर आसाममधील काचर, हेलकांडी आणि करीमगंज या जिल्ह्यांच्या सीमा आहेत. या सीमेची लांबी 164.6 किमी एवढी आहे. मागील अनेक वर्षांपासून सीमाप्रश्नाचा मुद्दा असून त्यावरून सातत्याने हिंसा होते. दोन्ही राज्यांतील नागिरक अनेकदा एकमेकांना भिडतात. जून महिन्यातही अशीच घटना घडली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख