आसामच्या पुत्राच्या अटकेवरुन मंत्री संतापले अन् उद्धव ठाकरेंना ठरवले नालायक पुत्र - Assam Minister Himanta Biswa Sarma slams Uddhav Thackeray over Arnab Goswami arrest | Politics Marathi News - Sarkarnama

आसामच्या पुत्राच्या अटकेवरुन मंत्री संतापले अन् उद्धव ठाकरेंना ठरवले नालायक पुत्र

वृत्तसंस्था
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्याचा मुद्द्यावरुन वातावरण तापले आहे. या प्रकरणी भाजप नेते मैदानात उतरले असून, त्यांनी महाराष्ट्र सरकारला लक्ष्य केले आहे. 

गुवाहाटी :  रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन राजकारण सुरू झाले आहे. भाजपच्या अनेक नेत्यांना गोस्वामींवरील कारवाईवरुन महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. गोस्वामी हे आसामचे असल्याने तेथे या कारवाईते पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे नेते व आसामचे मंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी या प्रकरणी महाराष्ट्र सरकारला लक्ष्य केले आहे.  

गोस्वामी यांच्या अटकेवरुन आसाममधील नेते संतप्त झाले आहेत. आसाममधील राजकारण्यांकडून या प्रकरणी महाराष्ट्र सरकारचा निषेध सुरू आहे. आसामचे मंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी या प्रकरणी उद्धव ठाकरे यांनाच थेट लक्ष्य केले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देशाचा विश्वासघात केला आहे. ते बाळासाहेब ठाकरेंचे नालायक पुत्र आहेत. त्यांनी त्यांचे पिता, महाराष्ट्र आणि देशाची अप्रतिष्ठा केली आहे. 

सरमा यांनी या प्रकरणी मुंबईच्या पोलीस आयुक्तांवरही टीका केली आहे. ते म्हणाले की, मी ऐकले होते की, मुंबईचे पोलीस आयुक्त हे कणखर अधिकारी आहेत. परंतु, अर्णब गोस्वामींना अटक करण्यासाठी त्यांनी एके47 घेतलेले पोलीस पाठवले होते. यातून ते देशातील सर्वांत भ्याड पोलीस अधिकारी असल्याचे दाखवून दिले आहे.

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला आहे.  २०१८ मध्ये इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. 

त्यावेळी पोलिसांना अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून, त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. या वर्षीच्या मे महिन्यात अन्वय यांची कन्या अज्ञा नाईक हिने हा तपास नीट झाला नसल्याची तक्रार केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी सीआयडी चौकशीचा आदेश दिला होता. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख