गेहलोतांची जादू चालली; राजस्थानमध्ये अखेर काँग्रेस सरकार जिंकले

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांचे मनोमिलन झाले आहे. मागील महिनाभरापासून अस्थिरतेच्या उंबरठ्यावर असलेले गेहलोत सरकार अखेर स्थिरस्थावर झाले आहे.
ashok gehlot led rajasthan government wins vote of confidence in assembly
ashok gehlot led rajasthan government wins vote of confidence in assembly

जयपूर : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी पुकारलेले बंड शमले असून, काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विधानसभेचे अधिवेशन आजपासून सुरू झाले असून, पायलट हे सभागृहात उपस्थित होते. विधानसभेत गेहलोत सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकून विरोधकांना जोरदार चपराक लगावली आहे. गेहलोत यांनी विरोधकांना चितपट केले असून, पुन्हा एकदा सरकारवरील पकड घट्ट केली आहे. 

पायलट यांचे समर्थक आमदार आता पुन्हा काँग्रेसच्या गोटात परतले आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन पक्षश्रेष्ठींनी पायलट यांना दिले आहे. मात्र, याचवेळी सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावेळी गेहलोत यांच्या पारड्यात मत टाकण्याची अट पायलट यांच्यासह बंडखोर आमदारांना घालण्यात आली होती. गेहलोत यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकावल्यानंतर पायलट हे हरियानात गेले होते. तब्बल महिन्यानंतर पुन्हा राजस्थानमध्ये ते दाखल झाले आहेत. जयपूरमधील निवासस्थानी समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत झाले होते. 

राज्यातील काँग्रेसमधील बंड अखेर शमल्याने पक्षात आनंदाचे वातावरण आहे. बंडखोर आमदारही आता परतले आहेत. काँग्रेसचे सर्व आमदार आता हॉटेल फेअरमाँट येथे ठेवण्यात आले आहेत. याबद्दल पत्रकारांशी बोलताना गेहलोत म्हणाले की, विश्वासघात झाल्यानंतर मी नाराज झालो होतो. परंतु, शेवटी प्रत्येकाला पुढे जावे लागते. मी सगळे विसरून गेलो असून सर्वांना माफ केले आहे. 

काँग्रेसने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. हा ठराव अखेर गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जिंकला आहे. या ठरावावर बोलताना गेहलोत यांनी भाजपला लक्ष्य केले. ते म्हणाले की, तुम्ही सक्त वसुली संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि प्राप्तिकर विभाग (आयटी) यांचा गैरवापर केला. तुम्ही दूरध्वनीवरुन बोलत असताना समोरच्याला फेसटाईम आणि व्हॉट्सअॅपवर तुमच्याशी संवाद साधण्यास सांगू शकत नाही. लोकशाहीत असे प्रकार योग्य नाहीत. 

गेहलोत आणि पायलट यांचे हस्तांदोलन आणि गळामिठ्या पाहता दोघांमधील संघर्ष संपला असेच चित्र होते. पायलट आज विधानसभा अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी आले. मात्र, त्यांची जागाच बदललेली दिसली. आधीच्या जागेपासून आताची त्यांची जागा सभागृहात अगदी विरुद्ध बाजूला आहे. त्यांना विरोधी पक्षांच्या बाजूची जागा देण्यात आली आहे. यावरील आश्चर्य स्वत: पायलटही लपवू शकले नाहीत. मात्र, आजच्या सभागृहातील बसण्याच्या जागेवरुन अजूनही धुसफूस सुरू असल्याचे समोर आले आहे. 

पायलट हे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री होते. त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात बंड केल्याने काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदावरुन 14 जुलैला उचलबांगडी केली होती. याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी पायलट आणि इतर १८ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com