केजरीवालांची मागणी अन् 24 तासांतच मोदींनी घेतला निर्णय - arvind kejriwal demanded cancellation of cbse exms to central government | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

केजरीवालांची मागणी अन् 24 तासांतच मोदींनी घेतला निर्णय

वृत्तसंस्था
बुधवार, 14 एप्रिल 2021

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने केंद्र सरकारने सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज विक्रमी वाढ होत चालली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल (ता.13) केली होती. आज मोदी सरकारने सीबीएसईची दहावीची परीक्षा रद्द केली असून, बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे. केजरीवाल यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.  

केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सीबीएसईच्या परीक्षा रद्द कराव्यात, अशी मागणी कालच (ता.13) केली होती. केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सीबीएसईच्या परीक्षा रद्द कराव्यात, असे ते म्हणाले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत दहावीची परीक्षा रद्द आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. याचे केजरीवाल यांनी स्वागत केले आहे. ते म्हणाले की, या परीक्षा रद्द आणि पुढे ढकलल्या याचा मला आनंद आहे. लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. 

देशात दररोज पावणेदोन लाखांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. पहिल्या लाटेच्या तुलनेत सध्याची वाढ प्रचंड वेगाने होत आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसह दहावी व बारावीच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या परीक्षा जून महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे राज्याने केंद्र सरकारकडे सीबीएसई परीक्षा पुढे ढकलण्याचीही मागणी केली होती. तसेच दिल्ली, पंजाबसह अन्य राज्यांनीही या परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केंद्राल केली होती. या परीक्षा ता. 4 मे पासून सुरू होणार होत्या. 

यानुषंगाने पंतप्रधानु नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक झाली. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांच्यासह शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारीही बैठकीला उपस्थित होते. विद्यार्थ्यांची सुरक्षितता हे सरकारचे प्राधान्य असल्याचे पंतप्रधानांनी बैठकीत स्पष्ट केले. तसेच त्यांच्या शैक्षणिक नुकसानही होऊ दिले जाणार नाही, असे स्पष्ट करत बैठकीत परीक्षांबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली असून बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 

असा लावणार दहावीचा निकाल
दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थी व पालकांना निकालाची चिंता सतावणार आहे. कारण मंडळाने निकाल लावण्यासाठी एक वस्तुनिष्ठ निकष ठरविला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना गुण दिले जातील. याबाबत मंडळाकडून अद्याप स्पष्टता करण्यात आलेली नाही. त्यामुळे नेमका निकाल लावताना कोणत्या गोष्टींचा विचार होणार, हे गुलदस्त्यात आहे. 

...तर दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार
मंडळाने निकषानुसार निकाल लावल्यानंतर विद्यार्थी त्याबाबत असमाधानी असतील तर त्यांना परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर परीक्षेबाबतचा निर्णय घेतला जाईल. त्यावेळी संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल. असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. 

बारावी परीक्षेचा निर्णय एक जूननंतर
इयत्ता बारावी परीक्षेचा निर्णय 1 जूननंतर घेतला जाणार आहे. कोरोनाची त्यावेळची स्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना किमान 15 दिवस आधी कळविले जाईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख