अर्णब गोस्वामींच्या चॅटमुळे भाजप बॅकफूटवर...नेते तोंड उघडेनात!

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बीएआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त चॅट उघड झाले आहे.
on arnab goswami whats app chat contoversy bjp is on backfoot
on arnab goswami whats app chat contoversy bjp is on backfoot

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट रिसर्च ऑडियन्स कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त व्हॉट्सअॅप चॅट उघड झाले आहे. बालाकोटमधील हल्ल्यासह अतिशय महत्वाची माहिती गोस्वामींना आधीपासूनच असल्याचे यातून समोर आले आहे. यावरुन आता गोस्वामींसह भाजप सरकार अडचणीत आले असून, काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.  

बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या काही अधिकाऱ्यांना अटक झाली असून, चौकशीचा फेरा सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी ब्रॉडकास्ट रिसर्च ऑडियन्स कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली होती. गोस्वामी हे रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी दासगुप्ता यांना लाखो रुपये देत असल्याची खळबळजनक बाब तपासात समोर आली होती. 

गोस्वामी यांच्या व्हॉट्सअॅप चॅटवरुन मोठा राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. काँग्रेसने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, भाजप नेत्यांनी या प्रकऱणी मौन धारण केले आहे. काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी या प्रकरणी भाजप सरकारला लक्ष्य केले आहे. त्यांनी ट्विट केले असून, त्यात संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी टॅग केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, बालाकोटमधील हल्ला होण्याच्या तीन दिवस आधी पत्रकार (आणि त्याच्या मित्राला) माहिती होती का? याचे उत्तर होय असेल तर, त्याचा स्त्रोत इतरांशी माहितीची देवाणघेवाण करीत नसेल हे कशावरुन? तो स्त्रोत पाकिस्तानच्या हेरांनाही अशी माहिती देऊ शकतो. अशा प्रकारे एका पत्रकाराला सरकार का पाठबळ देत आहे? 

या प्रकरणी काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून चौकशीची मागणी केली आहे. ते म्हणाले की, या प्रकरणी संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून चौकशी करण्याची गरज आहे. आता समोर आलेली वस्तुस्थिती ही बालाकोटमधील हल्ला आणि 2019 मधील सार्वत्रिक निवडणुका यांचा थेट संबंध दर्शविणाऱ्या आहेत. निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याचा वापर करण्यात आला का, याची चौकशी व्हायला हवी. 

गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त चॅट मुंबई पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहे. यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात गोस्वामी यांनी पंतप्रधान कार्यालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयचा वापर व्यवसायाच्या वाढीसाठी केल्याचे समोर आले आहेत. गोस्वामी यांनी पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि माहिती व प्रसारण मंत्रालयातील स्वत:च्या वजनाचा अभिमानाने उल्लेख केला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com