अर्णब गोस्वामींना मोबाईल वापरणं पडलं महागात...थेट तळोजाला हलवलं..!

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन गदारोळ सुरू आहे. तेन्यायालयीन कोठडीत मोबाईल वापरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
arnab goswami shifted to taloja jail for using mobile phone in judicial custody
arnab goswami shifted to taloja jail for using mobile phone in judicial custody

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. गोस्वामी यांची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. गोस्वामी यांचा कागदोपत्री तुरुंगात मुक्काम असला तरी त्यांचा प्रत्यक्षातील मुक्काम मात्र, अलिबागमधील महापालिकेच्या शाळेतच होता. परंतु, गोस्वामी हे मोबाईल वापरत असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी त्यांची रवानगी थेट तळोजा तुरुंगात केली आहे. 

गोस्वामी यांना वरळीतील निवासस्थानातून 4 नोव्हेंबरला अटक करुन अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने गोस्वामी यांची रवानगी 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली होती. न्यायालयीन कोठडीमुळे गोस्वामी यांना तुरुंगात हलवण्यात आले. प्रत्यक्षात कोरोनाच्या उपाययोजनांमुळे त्यांना तुरुंगात नेण्यात आले नाही. त्यांना अलिबाग महापालिकेच्या शाळेत ठेवण्यात आले होते. अलिबाग तुरुंग प्रशासनाने कोरोनामुळे विलगीकरणाची व्यवस्था या शाळेत केली आहे. 

अलिबाग पोलीस ठाण्यापासून सुमारे 15 मिनिटे अंतरावर ही शाळा आहे. या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होती. इतर कोणालाही शाळेत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. कोणत्याही आरोपीला तुरुंगात पाठवण्याआधी आता या शाळेत विलगीकरणात ठेवले जाते. गोस्वामी यांच्यासोबतच्या इतर दोन आरोपींनाही याच शाळेत ठेवण्यात आले होते. 

आज सकाळी शाळेत गोस्वामी हे मोबाईल वापरत असताना सापडले. यामुळे त्यांची रवानगी तळोजा तुरुंगात करण्यात आली. या विषयी रायगड पोलिसांनी म्हटले आहे की, गोस्वामी हे न्यायालयीन कोठडीत असताना कोणाचा तरी मोबाईल घेऊन सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचे समोर आले. वरळीतील निवासस्थानातून गोस्वामींना अटक करताना पोलिसांनी त्यांच्या मोबाईलही जप्त केला आहे. यामुळे अलिबाग तुरुंगाच्या अधीक्षकांना आम्ही पत्र दिले. न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी मोबाईल कसा वापरतो, असा प्रश्न आम्ही विचारला होता. यामुळे त्यांनी गोस्वामी यांना तातडीने तळोजा तुरुंगात हलवले.  

गोस्वामी यांनी अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयात त्यावर काल (ता.7) सुनावणी झाली होती. गोस्वामी यांनी अटकेला आव्हान देऊन या प्रकरणातून तात्पुरता दिलासा देण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला असून, गोस्वामी यांना तातडीने कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. याचबरोबर कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यास 4 दिवसांची मुदत दिली आहे. 

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी (ता.4) महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक हे दोघे २०१८ मध्ये अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. 

पोलिसांना त्यावेळी अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून, त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. या वर्षीच्या मे महिन्यात अन्वय यांची कन्या अज्ञा नाईक हिने हा तपास नीट झाला नसल्याची तक्रार केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी सीआयडी चौकशीचा आदेश दिला होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com