अर्णब गोस्वामींचा मुक्काम तुरुंगात नव्हे तर महापालिकेच्या शाळेत..! - arnab goswami is placed in school as designated quarantine center for alibaug jail | Politics Marathi News - Sarkarnama

अर्णब गोस्वामींचा मुक्काम तुरुंगात नव्हे तर महापालिकेच्या शाळेत..!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन गदारोळ सुरू आहे. गोस्वामी यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 
 

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. गोस्वामी यांची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. गोस्वामी यांनी अटकेच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर आज झालेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने गोस्वामी यांनी कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. यामुळे गोस्वामी यांचा कागदोपत्री तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला असला तरी त्यांचा प्रत्यक्षातील मुक्काम मात्र, अलिबागमधील महापालिकेच्या शाळेतच राहणार आहे. 

गोस्वामी यांना वरळीतील निवासस्थानातून बुधवारी (ता.4) अटक करुन अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने गोस्वामी यांची रवानगी 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली होती. न्यायालयीन कोठडीमुळे गोस्वामी यांना तुरुंगात हलवण्यात आले. प्रत्यक्षात कोरोनाच्या उपाययोजनांमुळे त्यांना तुरुंगात नेण्यात आले नाही. त्यांना अलिबाग महापालिकेच्या शाळेत ठेवण्यात आले आहे. अलिबाग तुरुंग प्रशासनाने कोरोनामुळे विलगीकरणाची व्यवस्था या शाळेत केली आहे. 

अलिबाग पोलीस ठाण्यापासून सुमारे 15 मिनिटे अंतरावर ही शाळा आहे. या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. इतर कोणालाही शाळेत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही आरोपीला तुरुंगात पाठवण्याआधी आता या शाळेत विलगीकरणात ठेवले जाते. गोस्वामी यांच्यासोबतच्या इतर दोन आरोपींनाही याच शाळेत ठेवण्यात आले आहे. गोस्वामी यांच्या जामिनाबाबत उच्च न्यायालय उद्या काय निर्णय देते यावर त्यांचा शाळेतील मुक्काम किती काळ राहील हे ठरणार आहे. 

गोस्वामी यांनी अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयात यावर आज सुनावणी झाली. गोस्वामी यांनी अटकेला आव्हान देऊन या प्रकरणातून तात्पुरता दिलासा देण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी आज तहकूब करीत उद्या  दुपारी 12 वाजता ठेवली आहे. याचबरोबर या प्रकरणात कोणताही आदेश देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दोन्ही बाजू ऐकून निर्णय देण्यात येईल, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. यामुळे गोस्वामी यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. 

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी (ता.4) महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक हे दोघे २०१८ मध्ये अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. 

पोलिसांना त्यावेळी अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून, त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. या वर्षीच्या मे महिन्यात अन्वय यांची कन्या अज्ञा नाईक हिने हा तपास नीट झाला नसल्याची तक्रार केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी सीआयडी चौकशीचा आदेश दिला होता. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख