सर्वोच्च न्यायालय म्हणाले, अर्णब गोस्वामींचे चॅनेल पाहत नाही पण... - on arnab goswami bail hearing supreme court says i do not watch his channel | Politics Marathi News - Sarkarnama

सर्वोच्च न्यायालय म्हणाले, अर्णब गोस्वामींचे चॅनेल पाहत नाही पण...

वृत्तसंस्था
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन गदारोळ सुरू आहे. त्यांनी आता थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. गोस्वामी यांची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. गोस्वामी हे सध्या तळोजा तुरुंगात आहेत. गोस्वामी यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यावर गोस्वामी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने काही प्रश्न आज उपस्थित केले.   

गोस्वामी यांना वरळीतील निवासस्थानातून 4 नोव्हेंबरला अटक करुन अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने गोस्वामी यांची रवानगी 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली होती. न्यायालयीन कोठडीमुळे गोस्वामी यांना सध्या त्यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे. 

गोस्वामी यांनी अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबरला गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर निर्णय दिला. उच्च न्यायालयाने गोस्वामी यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. दरम्यान, गोस्वामी यांनी अलिबाग सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर अलिबाग न्यायालयाला चार दिवसांत निर्णय देण्याचेही उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. 

आता याप्रकरणी गोस्वामी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड आणि इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी सुरू आहे. यावरील सुनावणीवेळी खंडपीठाने अनेक प्रश्न उपस्थित केले. न्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, मी त्यांचा चॅनेल पाहत नाही. त्या विचारसरणीशी तुम्ही सहमत नसाल. मात्र, घटनात्मक जबाबदारी असलेली न्यायालये जर हस्तक्षेप करणार नसतील तर आपण विनाशाच्या वाटेवर चाललो आहोत हे मान्य करावे लागेल. 

आम्ही उच्च न्यायालयाला आज संदेश देऊ इच्छितो की त्यांनी व्यक्तिगत स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी त्यांच्या अधिकारांचा वापर करावा. आपली लोकशाही ही जिवंत आहे. सरकारने अशा चॅनेलकडे दुर्लक्ष करायला हवे. अशा मुद्द्यावर निवडणूक लढली जात नाही. ते चॅनेलवर काय बोलतात याचा निवडणुकीत काही फरक पडतो असे तुम्हाला वाटते का, असेही खंडपीठाने सुनावले. 

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी (ता.4) महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक हे दोघे २०१८ मध्ये अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. 

पोलिसांना त्यावेळी अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून, त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. आता पुन्हा या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख