अन्यथा देशाचे तुकडेतुकडे होतील; मौलानांचा थेट लष्कराला इशारा - Army should stop interfering in Pakistan says Maulana Fazlur Rehman | Politics Marathi News - Sarkarnama

अन्यथा देशाचे तुकडेतुकडे होतील; मौलानांचा थेट लष्कराला इशारा

वृत्तसंस्था
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

पाकिस्तानची धुरा इम्रान खान यांनी स्वीकारल्यापासून देशात सर्वांत मोठा संघर्ष सुरू झाला आहे. इम्रान खान यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळातील हा सर्वांत मोठा तिढा आहे. 

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये पोलीसप्रमुखाचे निमलष्करी दलांनी अपहरण केल्याच्या घटनेवरुन देशभरात गदारोळ उडाला आहे. यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात एकत्र आलेल्या विरोधी पक्षांच्या आंदोलनाची धार वाढली आहे. इम्रान खान यांच्या हकालपट्टीसाठी विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. या प्रकरणी जमाते उलेमा इस्लाम (एफ) प्रमुख मौलाना फजलूर रेहमान यांनी लष्कराला थेट इशारा दिला आहे. 

रेंजर्स या निमलष्करी दलाने दक्षिण सिंध प्रांताचे पोलीस महानिरीक्षक मुश्ताक अहमद महर यांच्या घरावर छापा घातला होता. रेंजर्सनी महर यांचे अपहरण केले होते. विरोधी पक्षनेते सफदर अवान आणि बिलावल भुट्टो झरदारी यांच्या पक्षाचे प्रवक्ते मुस्तफा नवाझ खोखार यांच्या अटकेच्या आदेशावर जबरदस्तीने महर यांना स्वाक्षरी करावयास लावली, असा आरोप होत आहे. सफदर हे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे जावई आहेत. 

या प्रकरणी पोलीस आणि रेंजर्स आमनेसामने आले आहेत. इम्रान खान यांच्या लष्कर समर्थक सरकारने अद्याप या मुद्द्यावर जाहीर भूमिका घेतलेली नाही. पंतप्रधानांच्या प्रवक्त्यांनीही याविषयी बोलण्यास नकार दिला आहे. दरम्यान, सिंध पोलीस प्रमुखांच्या अपहरणाच्या चौकशीचा आदेश लष्करप्रमुख कमार जावेद बाजवा यांनी दिला आहे. 

महर यांच्यासह सिंध पोलीस दलाच्या 20 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांनी साठ दिवसांची रजा मागितली आहे. महर यांच्या अपहरणामुळे पोलीस दलाच्या मनोधैर्यावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे कारण देण्यात आले. नंतर या प्रकरणी लष्कराने चौकशीचा आदेश देण्यात आल्याने महर यांनी रजेचा अर्ज मागे घेतला आहे. लष्कराचा चौकशी अहवाल येईपर्यंत सहकाऱ्यांनी रजेचे अर्ज मागे घ्यावेत, असे महर यांनी म्हटले आहे.  

आता या प्रकरणी मौलाना फजलूर रेहमान यांनी लष्कराला इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सरकारी आणि पोलिसांच्या नागरी प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करणे पाकिस्तानच्या लष्कराने थांबवावे. हा हस्तक्षेप थांबला नाही तर देशात एकता राहणार नाही. संपूर्ण देशावर लष्कराचे नियंत्रण आहे. प्रत्येक तालुक्यात मेजर आणि प्रत्येक जिल्ह्यात कर्नल बसला आहे. देशातील प्रत्येक शिखर संस्थेत लष्करी अधिकारी शिरले आहे. त्यांच्यासमोर आयुक्त आणि महासंचालक हेही असहाय वाटतात. 

कालच्या घटनेने लष्कराचे नियंत्रण उघडपणे समोर आले आहे. पाकिस्तानी लष्कराने सर्व तालुके, जिल्हे आणि शहरे आणि विभाग सोडून खाली करायला हवेत. याचबरोबर नागरी प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करणे थांबवायला हवे. अन्यथा देशात एकताच राहणार नाही, असे मौलाना रेहमान यांनी स्पष्ट केले. 

इम्रान खान यांच्या विरोधात 11 पक्ष आंदोलन करीत आहेत. आता रेंजर्स आणि पोलीस संघर्षामुळे विरोधी पक्षांच्या आंदोलनाला आणखी जोर आला आहे. देशभरात सरकारविरोधात विरोधी पक्ष रस्त्यावर उतरत आहेत. देशातील वाढती महागाई आणि अन्नधान्याची टंचाई या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी सरकारला सळो की पळो करुन सोडले आहे. याचबरोबर सरकारच्या कामकाजातील लष्कराचा हस्तक्षेप थांबवावा, अशी प्रमुख मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख