अर्णब गोस्वामींच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे पुराव्याचा एक कागदही नाही! - arg outlier filed affidavit in high court against mumbai police | Politics Marathi News - Sarkarnama

अर्णब गोस्वामींच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे पुराव्याचा एक कागदही नाही!

वृत्तसंस्था
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीसह अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ होत असताना मुंबई पोलिसांकडे कोणतेच पुरावे नाहीत, असा दावा करण्यात आला आहे.  

मुंबई : बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीसह तिचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत. रिपब्लिक टीव्हीची पालक कंपनी असलेल्या एआरजी आऊटलियर प्रायव्हेट लिमिटेडने या प्रकरणी प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहे. यात रिपब्लिक टीव्ही, गोस्वामी आणि वृत्तवाहिनीच्या इतर कर्मचाऱ्यांविरोधात एकही पुरावा मुंबई पोलिसांकडे नसल्याचा दावा करण्यात आला आहे.   

बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या काही अधिकाऱ्यांना अटक झाली असून, चौकशीचा फेरा सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली होती. गोस्वामी हे रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी दासगुप्ता यांना लाखो रुपये देत असल्याची खळबळजनक बाब तपासात समोर आली होती. 

हेही वाचा : अर्णब गोस्वामी सुनावणीला पुन्हा गैरहजर...अखेर न्यायालयानं दिली तंबी!

एआरजी आऊटलिअरने या गुन्ह्यातून वृत्तवाहिनी आणि कर्मचाऱ्यांची मुक्तता करावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात केली होती. यावर मुंबई पोलिसांनी म्हणणे मांडले होते. यावर आता एआरजी आऊटलिअरने आज उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. 

या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, सुशांतसिंह राजपूत आणि पालघर हत्याकांड प्रकरणात निर्भयपणे बातम्या दिल्याने तथाकथित टीआरपी गैरव्यवहारात आम्हाला अडकवण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांना दाखल केलेले आरोपपत्र आकाराने मोठे असले तरी त्यात आमच्याविरोधात पुराव्याचा एक कागदही नाही. राजकीय सू़डातून आमच्यावर कारवाई करण्यात येत आहे. 

हेही वाचा : गोस्वामी अन् त्यांची पत्नी अडचणीत...

दरम्यान, दासगुप्तांच्या जामिनावर उच्च न्यायालयासमोर नुकतीच सुनावणी झाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणातील सूत्रधार कोण आणि यात दासगुप्तांची भूमिका काय, असा प्रश्न उच्च न्यायालयाने विचारला. यावर सरकारी वकिलांना आरोपपत्रात दासगुप्ता हेच सूत्रधार असल्याचे सांगितले होते. यावर या प्रकरणातील मास्टरमाईंड अर्णब गोस्वामी आहेत, असे दासगुप्तांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितले होते.    

बनावट टीआरपी प्रकरणात पोलिसांनी 11 जानेवारीला पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. यात बीएआरसीच्या फॉरेन्सिक ऑडिटचाही समावेश होता. तसेच, गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट आणि 59 व्यक्तींचे जबाबही न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख