म्हणून व्यंकय्या नायडू यांनी थेट वंदना चव्हाण यांना फोन केला....

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार वंदना चव्हाण यांची उपाध्यक्षांच्या पॅनलमध्ये खास नियुक्ती
Vandana Chavan
Vandana Chavansarkarnama

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी (Parliament session) अधिवेशनातील पहिला साराच आठवडा राज्यसभेत विरोधकांची पूर्ण अनुपस्थिती किंवा प्रचंड गोंधळाच्या पाण्यात वाहून जाणार हे आता स्पष्ट झाले आहे. मात्र, गदारोळ व आरोप-प्रत्यारोपांच्या या गर्दीत वरिष्ठ सभागृहातील एका घटनेकडे फारसे कोणाचे लक्ष गेलेले नाही. ही घटना म्हणजे उपाध्यक्षांच्या समितीची (पॅनल) नवीन रचना.

साधारणतः ६ सदस्यांच्या या प्रतिष्ठेच्या पॅनलमध्ये राज्यसभाध्यक्षांनी आपल्या अधिकारात आणखी दोन सदस्यांची खास नियुक्ती केली. त्यात सुखेंदूशेखर राय यांच्यासह नाव आहे वंदना चव्हाण (Vandana Chavan) यांचे! राज्यसभेच्या (RajyaSabha) अलीकडच्या इतिहासात सहापेक्षा जास्त सदस्यांचे उपसभापती पॅनल असण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Vandana Chavan
'महागाईविरोधातील आवाज दाबण्यासाठीच गांधी कुटुंबाची ईडी चौकशी!'

राज्यसभेत उपाध्यक्षांना दुपारी १२ पासून दिवसभर कामकाज पहाणे प्रॅक्टीकली शक्य नसते. त्यामुळे त्यांना सहाय्य करण्यासाठी एक पॅनल किंवा समिती नेमण्यात येते. या समितीत सहा सदस्य असतात. राज्यसभेच्या सुरवातीपासूनच ही रचना असते. वर्षातून एकदा या पॅनलची रचना राज्यसभाध्यक्ष आपल्या अधिकारात करतात. ते करताना ते संबंधित सदस्यांची सभागृहातील कामगिरी लक्षात घेतात. मोदी सरकार आल्यावर सातत्याने तप्त वातावरण असलेल्या राज्यसभेत २०१४ नंतर कितीही गोंधळ झाला तरी हौद्यात (वेल) येऊन घोषणाबाजी करण्याचे कटाक्षाने टाळणारे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व बीजू जनता दल हे दोनच पक्ष आहेत.

चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या साऱ्या खासदारांनी ते पाळलेले आहे. चव्हाण यांना उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची गेल्या २ वर्षांत साधारणतः १०- १२ वेळा संधी मिळाली. या काळात त्यांनी चालविलेल्या कामकाजाबद्दल राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडू व उपाध्यक्ष हरिवंश यांच्यासह अनेकांनी त्यांना पावती दिली आहे. एका प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी मंत्र्यांनाही, कृपया (लांबण न लावता) थोडक्यात उत्तरे द्या, अशी सौम्यपणे समज दिली तेव्हा सभागृहात हास्याचे फवारे उडाले होते.

यंदा उपाध्यक्षांच्या पॅनलची रचना करतेवेळी सकाळीच राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांनी चव्हाण यांना फोन केला. तुमची निवड करण्याची माझी स्वतःची इच्छा होती. पण सचिवालयाने ६ पेक्षा जास्त सदस्य करता येत नाहीत असे सांगितले म्हणून माझा नाईलाज झाला, असे सांगितले होते. त्यावर चव्हाण यांनी, मी अजिबात नाराज नाही व नाराज होणारही नाही. आपण फोन केलात हीच माझ्यासाठी मोठी बाब आहे असे सांगितले. पहिल्या पॅनलमध्ये भुवनेश्वर कलिता, इंदूबाला, के. हनुमंतय्या, तिरूची सिवा, विजय साई रेड्डी व डॅा. सस्मित पात्रा यांचा समावेश होता.

Vandana Chavan
शिवसेनेचा गटनेता लोकसभा अध्यक्षांनी परस्पर बदलला : विनायक राऊतांचा आरोप

मात्र, नायडू यांनी आज कामकाजाच्या सुरवातीलाच राय व चव्हाण यांचा आपण या पॅनलमध्ये समावेश केल्याचे सांगितले. चव्हाण यांच्याशी बोलताना नायडू यांनी सांगितले की जेव्हा मी याबाबतची नियमावली पाहिली तेव्हा, सहा म्हणजे सहाच सदस्य या पॅनलमध्ये असावेत असा नियम किंवा बंधन त्यात नसल्याचे आढळले. तेव्हा मी तुमचे नाव त्यात समाविष्ट करण्यास सांगितल्याचे चव्हाण यांच्याशी बोलताना नमूद केले.

एखाद्या मुद्यावर सभागृहात आम्ही सरकारला विरोध करत असू तर त्या वेळी उपसभापती म्हणून कामकाज पहाणे माझ्या व माझ्या पक्षाच्या तत्वात बसत नाही. त्यामुळे मी त्या वेळी उपसभापती म्हणून कामकाज पाहण्यास सांगितले तरी नम्रपणे नकार दिलेला आहे, असे वंदना चव्हाण यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in