बांगलादेशी अन् रोहिंग्यांची हकालपट्टी करावी असं तुम्ही आधी लिहून द्या; अमित शहांची भूमिका

हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या भाजपने अमित शहांसह राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांना उतरवले आहे.
Amit Shah says give in writing that Bangladeshis & Rohingyas have to be evicted
Amit Shah says give in writing that Bangladeshis & Rohingyas have to be evicted

हैदराबाद : हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचारामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने महापालिका निवडणुकीत पूर्ण जोर लावला असून, राष्ट्रीय पातळीवरील नेते प्रचारात उतरत आहेत. प्रचारात भाजप नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये करुन सामाजिक ध्रुवीकरण करण्यात येत आहे. भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री आज प्रचारात उडी घेतली. बांगलादेश आणि रोहिंग्या नागरिकांची हकालपट्टी करण्याबाबत शहांनी मोठे विधान केले आहे. 

हैदराबाद महापालिकेच्या प्रचाराला वेग आला आहे. राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून,  आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. महापालिकेसाठी येत्या १ डिसेंबरला मतदान होणार असून, ४ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. भाजपने नुकतीच डुब्बक विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची एक जागा जिंकली आहे. भाजपचे उमेदवार रघुनंदन राव यांनी तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) सोलिपेटा सुजाता यांचा 1 हजार 470 मतांनी पराभव केला होता. यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला असून, महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.  

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज प्रचारात उतरले आहेत. त्यांनी वादग्रस्त भाग्यलक्ष्मी मंदिरापासून प्रचाराचा सुरवात केली आहे. हे मंदिर हैदराबादमधील प्रसिद्ध चारमिनारच्या पायथ्याशी आहे. भारतीय पुरातत्व विभागाने या मंदिराचे बांधकाम अवैध ठरवले होते. तसेच, उच्च न्यायालयानेही या मंदिराचा विस्तार करण्यास मनाई घातली होती. 

शहा यांनी वादग्रस्त भाग्यलक्ष्मी मंदिराची निवड केली असून, सामाजिक ध्रुवीकरणासाठीच त्यांच्याकडून ही खेळी खेळली जात असल्याची चर्चा सुरू आहे. भाग्यलक्ष्मी मंदिरात आरती केल्यानंतर प्रचाराची सुरवात करुन शहा हे सनतनगर, खैराताबाद आणि ज्युबिली हिल्स भागात रोड शो करीत आहेत. याचबरोबर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे सुद्धा प्रचारात उतरत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कालपासून प्रचार सुरू करीत आहेत. 

हैदराबादमध्ये रोहिंग्या बेकायदा राहत असतील तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काय करीत आहेत, असा सवाल एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला होता. याला उत्तर देताना शहा म्हणाले की, मी कारवाई करतो त्यावेळी हेच लोक संसदेत गोंधळ घालतात. मला तुम्ही लेखी द्या की बांगलादेशी आणि रोहिंग्यांची हकालपट्टी करायची आहे. संसदेत त्यांची बाजू कोण घेते?  

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार तेजस्वी सूर्या यांनी टीआरएस आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर टीका करताना प्रक्षोभक भाषा वापरली होती. हैदराबादमधील ओल्ड सिटीत सर्जिकल स्ट्राईक करावा, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार केले होते. भाजपच्या नेत्यांकडून सुरू असलेल्या प्रक्षोभक भाषणांमुळे सामाजिक शांततेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे तेलंगणचे पोलीस महासंचालक महेंदर रेड्डी यांनी प्रक्षोभक भाषणे करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. आता पोलिसांनी बंडी संजय कुमार यांच्यासह एआयएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

हैदराबाद महापालिकेसाठी टीआरएसने सगळ्या 150 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. याचवेळी भाजप 149, काँग्रेस 146, तेलगू देसम पक्ष (टीडीपी) 106, एआयएमआयएम 51, डावे पक्ष 29 जागांवर निवडणूक लढत आहेत. मागील 2016 च्या निवडणुकीत टीआरएसने 99 जागांवर विजय मिळवून सत्ता स्थापन केली होती. यावेळीही टीआरएसने सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com