दिल्लीतील हिंसाचाराला अमित शहाच जबाबदार : काॅंग्रेसचा घणाघाती आरोप

शेतकरी आंदोलन भडकल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू
amit shah
amit shah

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी शेतकरी संघटनांच्या ट्रॅक्टर मोर्चाच्या नावाखाली उपद्रवी घटकांनी केलेल्या हिंसाचारासाठी केंद्र सरकार गृहमंत्री अमित शाह जबाबदार असल्याचा आक्रमक हल्ला काँग्रेसने चढविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तत्काळ अमित शहा यांना बडतर्फ करावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. लाल किल्ल्यामध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेमध्ये नाव येत असलेला दीप संधूची ‘मोदी शहा यांचा चेला’ अशी संभावना करताना हा संपूर्ण प्रकार शेतकरी आंदोलन कारस्थानाने दडपण्याचा प्रकार असल्याचाही आरोप केला आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिल्लीतील हिंसाचारावर केंद्र सरकारला आणि प्रामुख्याने गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केले. ‘आक्रमक झुंड लाल किल्ल्यामध्ये शिरत असताना दिल्ली पोलिस हातावर हात ठेवून बसले होते. या घटनाक्रमात मोदी-शाह यांचा चेला दीप संधूची हजेरी आश्चर्य आहे. सरकार बळाचा वापर करून शेतकरी आंदोलन दडपू शकले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना हटविण्यासाठी आता कारस्थान केले जात आहे,’ असा आरोप सुरजेवाला यांनी केला.

दिल्लीतील हिंसाचार आणि धुडगूस रोखण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची नव्हे तर सरकारची आहे, असा इशारा देताना देशाच्या स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला तसेच सर्वोच्च सुरक्षा असलेल्या लाल किल्ल्यामध्ये ४० ते ५० ट्रॅक्टर आणि धुडगूस घालणारे उपद्रवी मंडळी कसे शिरू शकतात, दीप संधू या सर्वांचे नेतृत्व करत होता. संधू आणि त्याच्या समर्थकांना लाल किल्ल्यापर्यंत जाण्याची परवानगी कोणी दिली, पोलिस खुर्च्यांवर बसून तमाशा पाहत होते, अशी प्रश्नांची फैर सुरजेवाला यांनी झाडली.

दिल्लीतील हिंसाचार शेतकरी आंदोलनाला वेगळे वळण देण्याचा प्रकार असल्याचे सूरजेवाला यांनी सूचक शब्दात सांगितले. ते म्हणाले की कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघटनांच्या आंदोलनामध्ये आतापर्यंत 178 शेतकऱ्यांनी प्राण गमावले आहेत. या शेतकऱ्यांना हिंसाचारच करायचा असता तर मागील 63 दिवसांपासून ते लाखोंच्या संख्येने हाडे गोठविणाऱ्या थंडीमध्ये दिल्लीच्या सीमेवर रस्त्यात कशाला बसले असते?
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com