अमित मालवीय, स्वरा भास्कर अन् दिग्विजयसिंह अडचणीत

हाथरसमधील अत्याचार प्रकरणावरून देशभरात संतापाचे वातावरण आहे. यामुळे उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
amit malviya swara bhaskar and digvijay singh disclosed hathras victim identity
amit malviya swara bhaskar and digvijay singh disclosed hathras victim identity

लखनौ : हाथरस येथील दलित मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणावरुन देशभरात वातावरण पेटले आहे. या मुद्द्यावर उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार तोंडघशी पडले आहे. यामुळे राज्य सरकारने अखेर या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवली आहे. आता या प्रकरणी भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय, अभिनेत्री स्वरा भास्कर आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजयसिंह अडचणीत येण्याची शक्यता आहे. 

हाथरसमधील 19 वर्षांत्या दलित युवतीवर चार जणांनी अत्याचार केला होता. ही घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली होती. नंतर उपचारादरम्यान दिल्लीतील रुग्णालयात त्या युवतीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरलीआहे. यातच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने त्या पीडितेच्या कुटुंबीयांना विश्वासात न घेता परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार केले होते. पोलिसांनी या प्रकरणी पुरावे नष्ट केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

योगी आदित्यनाथ या प्रकरणी तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड चालवली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीअंती हाथरसचे पोलीस अधीक्षक (एसपी), उपअधीक्षक (डीएसपी), पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकांची नार्को चाचणी करण्यात येणार आहे. योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे दिली आहे. 

पीडितेच्या कुटुंबीयांना हाथरसचे जिल्हाधिकारी पी.के.लक्सकर यांनी धमकावल्याचा आरोप करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी लावून धरली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली तपास करावा आणि हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांना हटवावे, अशी दोन मागण्या पीडितेच्या कुटुंबीयांनी सरकारकडे केल्या आहेत. अद्याप सरकारने यावर निर्णय घेतलेला नाही. 

हाथरसमधील पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी कडक पावले उचलण्याच्या इशारा दिला आहे. अमित मालवीय यांनी पीडितेचा व्हिडीओ ट्विट केला होता. त्यांनी म्हटले आहे की, हाथरस प्रकरणात बलात्कार सिद्ध झाल्यास पीडितेची ओळख जाहीर करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे. यात स्वरा भास्कर, दिग्विजयसिंह आणि अमित मालवीय यांचा समावेश आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडितेची ओळख जाहीर करणे हा गुन्हा आहे. सोशल मीडियावर आणि जंतरमंतरवरील आंदोलनावेळी पीडितेची ओळख उघड करण्यात आली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com