अफगाणिस्तान, इराक अन् सीरियातील अमेरिकी सैन्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय - america will withdraw it troops from iraq, iran and syria says donald trump | Politics Marathi News - Sarkarnama

अफगाणिस्तान, इराक अन् सीरियातील अमेरिकी सैन्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जगभरातून अमेरिकेचे सैन्य माघारी घेण्याची घोषणा केली आहे. अफगाणिस्तानसह इराक आणि सीरियामधून अमेरिकेचे सैन्य मायदेशी परतणार आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे जगभरात अनेक देशांमध्ये तैनात असलेले सैनिक पुन्हा माघारी बोलावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याची घोषणा केली आहे. अफगाणिस्तानातील चार हजार सैनिक अल्पावधीत माघारी बोलावण्यात येणार असून, इतर देशांत तैनात अमेरिकेचे सैन्यही टप्प्याटप्पयाने माघारी बोलाविण्यात येणार आहेत.

ट्रम्प यांनी व्हाईट हाउसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, अफगाणिस्तानच्या आघाडीवर आम्ही चांगली प्रगती केली आहे. त्यामुळे तेथून चार हजार सैनिक तातडीने माघारी बोलावण्यात येतील. अमेरिका इराकमधून आणखी दोन हजार सैनिक माघारी बोलावण्यात येतील. सीरियामधील अमेरिकेचे सैनिकही लवकरच परततील.

अमेरिकेचे सैनिक हे सीरियामध्ये तेल साठ्यांचे संरक्षण करत आहेत. अमेरिका तेथील कुर्द लोकांना मदत करत आहोत. तेथील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास आमच्या सैनिकांचा मोठा हातभार लागत आहे. अफगाणिस्तानमध्ये होणाऱ्या शांतता संमेलनात अमेरिका सहभागी होणार असून, यामध्ये परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ सहभागी होणार आहेत, असे ट्रम्प यांनी सांगितले.

अमेरिकेच्या आण्विक कार्यक्रमाशी निगडित कागदपत्रे उघड झाल्याचा दावा करण्यात आला होता. ट्रम्प यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. ते म्हणाले की, अमेरिकेच्या आण्विक शस्त्रसंपदेविषयी कोणालाही काही माहिती नाही. त्यामुळे आमच्या अण्वस्त्रांविषयी माहिती उघड होणे शक्य नाही.

तालिबानच्या हल्ल्यात १६ ठार
काबूल : अफगाणिस्तानमधील नानगारहार प्रांतात तालिबानी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर केलेल्या हल्ल्यात १६ जवान ठार झाले. इतर काहीजण जखमी झाल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. दहशतवाद्यांनी खोगयानी जिल्ह्यातील अफगाण लष्कर आणि पोलिसांच्या तपासणी नाक्यांना लक्ष्य केले. हा हल्ला एवढा भीषण होता की, त्यापैकी तीन नाके उध्वस्त झाले. अफगाणिस्तान सरकार व तालिबानदरम्यानच्या शांतता चर्चेला या हल्ल्यामुळे खीळ बसण्याची शक्यता आहे.

पाकने दहशतवाद्यांवर कारवाई करावी
वॉशिंग्टन : पाकिस्तानच्या भूमीचा दहशतवादी कारवायांसाठी होणारा वापर थांबविण्यासाठी पाकिस्तान सरकारने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी भारत आणि अमेरिकेने आज केली. तसेच, मुंबईवरील २६/११ चा हल्ला आणि पठाणकोटवरील हल्ल्याच्या सूत्रधारांसह इतर सर्व दहशतवाद्यांना शासन करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. भारत-अमेरिका दहशतवादविरोधी समितीच्या बैठकीत ही मागणी करण्यात आली.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख