जंगलराज आणणाऱ्यांना भारत माता की जय अन् जय श्री राम या घोषणाही नकोत! - Allies of jungle raj have problem with Bharat Mata Ki Jai and Jai Shri Ram says Modi | Politics Marathi News - Sarkarnama

जंगलराज आणणाऱ्यांना भारत माता की जय अन् जय श्री राम या घोषणाही नकोत!

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज दुसऱ्या टप्प्यात 94 मतदारसंघात मतदान होत आहे. 

पाटणा : बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रचार सभेत राष्ट्रीय जनता दलावर (आरजेडी) नाव न घेता हल्लाबोल केला. याच पक्षाने राज्यात जंगलराज आणले होते, अशी टीकाही त्यांनी केली. याच पक्षाच्या सहकारी पक्षांना 'भारत माता की जय' आणि 'जय श्री राम' या घोषणा देण्यातही अडचण वाटते, असा टोलाही त्यांनी लगावला. 

येथील सभेत बोलताना मोदी म्हणाले की, जंगलराजच्या काळात बिहारला अंधकारात ढकलण्यात आले होते. राज्यात असुरक्षितता आणि अराजक माजले होते. गरीबांना त्यांचा हक्क मिळत नव्हता. हे जंगलराज बिहारमध्ये आणणाऱ्या पक्षाचे सहकारी पक्ष 'भारत माता की जय' घोषणा देत नाहीत. याचा विचार तुम्ही करा. अनेक लोक असे आहेत ज्यांना ही घोषणा दिल्याने स्फुरण येते. मात्र, जंगलराजच्या सहकाऱ्यांना ही घोषणा दिली जाऊ नये असे वाटत नाही. याचबरोबर तुम्ही 'जय श्री राम' असेही म्हणू नये, अशीही त्यांची इच्छा आहे. 

जंगलराजच्या काळात मतदाने केंद्रे ताब्यात घेतली जात असत. आता मात्र, असे काही घडताना दिसत नाही. कारण लोक आता घाबरत नाहीत. जंगलराजच्या सहकाऱ्यांना भारत मातेबाबतही अडचण आहे. एक गट म्हणतो की तुम्ही 'भारत माता की जय' घोषणा देऊ नका आणि दुसऱ्याला या घोषणेमुळे डोकेदुखी होते. आता भारत मातेच्या विरोधातील हे लोक मते मागण्यासाठी तुमच्याकडे येत आहेत. त्यांना तुम्ही योग्य उत्तर द्या, असे मोदी म्हणाले.  

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा  आज सुरू असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) एलजेपी बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तरावर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजपचे मोठ्या प्रमाणात बंडखोर नेते एलजेपीत दाखल झाले आहेत. ते जेडीयूच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. यामुळे भाजप आणि चिराग पासवान यांची छुपी युती असल्याची चर्चा सुरू आहे. 

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख