काँग्रेसने बिहारचे खापर फोडले ओवेसी साहेबांवर..! - All secular parties should be alert about vote cutter Owaisi Sahab says Congress | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसने बिहारचे खापर फोडले ओवेसी साहेबांवर..!

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची निकालाची उत्सुकता असून, चालू मतमोजणीत  महाआघाडीपेक्षा राष्ट्रीय लोकशाहीचे आघाडीचे पारडे जड दिसत आहे.  

पाटणा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाला (जेडीयू) सर्वांत मोठा धक्का बसला आहे. मात्र, भाजप हा राज्यात सध्या सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. एनडीए आघाडीवर तर महाआघाडी पिछाडीवर आहे. काँग्रेसलाही धक्का बसला असून, पक्षाचे याचे खापर आता एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर फोडण्यास सुरवात केली आहे. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत झाली. आज निकाल जाहीर होत आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे. 

मतमोजणीत एनडीएला एकूण 127 जागांवर आघाडीवर आहे. एनडीच्या जागा चारने वाढलेल्या दिसत आहेत. याचवेळी महाआघाडी 106  जागांवर आघाडीवर आहे. महाआघाडीच्या जागा पाचने कमी झालेल्या आहेत. यात जेडीयूला सर्वाधिक फटका बसला आहे. जेडीयू 43 जागांवर आघाडीवर आहे. मागील विधानसभा निवडणुकीत जेडीयूच्या 72 जागा होत्या. भाजप 76 जागा, राष्ट्रीय जनता दल 69, काँग्रेस 19 जागा असा कल दिसत आहे. 

काँग्रेसच्या जागा मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत सातने कमी होताना दिसत आहेत. पक्षाने याचे खापर आता एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर फोडण्यास सुरूवात केली आहे. ओवेसी हे भाजपचीच बी टीम असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. मतांच्या ध्रुवीकरणासाठी भाजपने ओवेसींना हाताशी धरले, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. 

याबाबत बोलताना काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी म्हणाले की, ओवेसी साहेबांचा वापर बिहारच्या निवडणुकीत करुन घेण्याचा भाजपचा मनसुबा यशस्वी होताना दिसत आहे. मते खाणाऱ्या ओवेसी साहेबांपासून सर्वच धर्मनिरपेक्ष पक्षांनी सावध राहायला हवे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मतमोजणीवर परिणाम झाल्याचे पहिलेच उदाहरण बिहारमध्ये घडत आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या वेळी मतमोजणी केंद्रांची संख्या दुपटीने वाढवण्यात आली आहे. मात्र, मतमोजणी टेबलांची संख्या तेवढीच ठेवण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरक्षित अंतर राखण्यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रांची संख्या 72 हजार 723 वरुन 1 लाख 6 हजार 515 वर नेण्यात आली आहे. मतमोजणीचे 35 फेऱ्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यामुळे दुपारनंतर स्पष्टपणे कल दिसू शकेल. आज दुपारी 12.15 वाजेपर्यंत केवळ 15 टक्केच मतांची मोजणी झाली होती. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख