#AirIndiaCrash  : कोण होते पायलट कॅप्टन दीपक साठे..?

1999च्या कारगिल युद्धातही साठे यांचा सहभाग होता. त्यांना राष्ट्रपती पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले होते.
dipak sathe f.jpg
dipak sathe f.jpg

पुणे : एअर इंडिया एक्स्प्रेसचे दुबईहून आलेले विमान काल रात्री कोझिकोड आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना कोसळले होते. या अपघातात प्रवाशांचे जीव वाचविण्याचा प्रयत्न करणारे पायलट कॅप्टन दीपक वसंत साठे (वय58) यांचा मृत्यू झाला आहे. पायलट दीपक वसंत साठे हे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) 58 च्या तुकडीचे विद्यार्थी होते. एनडीएच्या तुकडीचे दीपक साठे हे टॅापर होते.  स्वॉर्ड ऑफ ऑनरचे साठे हे विजेते होते. 

हवाई दलात ते 1981 मध्ये वैमानिक म्हणून रूजू झाले होते. भारतीय वायू दलातील एक निपुण पायलट म्हणून दीपक साठे यांची ओळख होती. ते एक निष्णात टेस्ट पायलट म्हणून ओळखले जात होते. प्रोटो टाईप एअरक्राफ्ट उडवण्यासाठी साठे यांनी प्रशिक्षण घेतले होतं. हवाई दल अकादमीतील प्रशिक्षणात ते अग्रेसर होते. अनेक प्रकारची विमानं ते सहज उडवित असतं. त्यांनी लढाऊ वैमानिक म्हणून 30 जून 2003 पर्यंत सेवा बजावली. निवृत्तीनंतर ते एअर इंडियात रूजू झाले होते. एअर इंडियाच्या ताफ्यातील मोठ्या आकाराचे एअरबस 310 हे विमान ते चालवत असतं त्यानंतर ते बोईंग विमान चालवतं होतं.


कॅप्टन दीपक साठे यांनी अंबाला येथे मिग 21 विमानाचे पायलट होते. 1999च्या कारगिल युद्धातही साठे यांचा सहभाग होता. त्यांना राष्ट्रपती पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले होते. ते उत्तम स्क्वैश खेळाडू होते. दीपक साठे यांचे वडील वसंत साठे हे लष्करात ब्रिगेडिय़र होते. दीपक साठे यांचे बंधू कारगील युध्दात शहीद झाले होते. कालच्या विमान अपघातात त्यांनी दोन वेळा विमान धावपट्टीवर उतरविण्याचा प्रयत्न केला होता. पाऊस आणि धावपट्टीवर चिखल असल्यामुळे विमानाचा अपघात झाला. दीपक साठे यांच्यामुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचले असल्याचे सांगण्यात येते. 

या प्रकरणी केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. त्यांनी पोलिसांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर मदत कार्य वेगाने करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन स्थितीचा आढावा घेतला आहे. कोझिकोड आणि मल्लपुरमचे जिल्हाधिकारी आणि पोलीस महानिरीक्षक अशोक यादव घटनास्थळी पोचले आहेत. 

ते मदतकार्यात सहभागी झाले असून, त्यावर देखरेखही ठेवत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले. याविषयी बोलताना राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे महासंचालक एस.एन.प्रधान म्हणाले की, कोझिकोड विमानतळावर टेबलटॉप धावपट्टी आहे. या दुर्घटनेत काही प्रवासी जखमी झाले आहेत. काही जण बेशुद्ध पडले आहेत.  कोझिकोडमध्ये विमान अपघात झाल्याने मी दु:खी झालो आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त करतो, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.   
 Edited  by : Mangesh Mahale    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com