#AirIndiaCrash  : पायलट दीपक साठेंसह 18 जणांचा मृत्यू

अपघातात प्रवाशांचे जीव वाचविण्याचा प्रयत्न करणारे पायलट कॅप्टन दीपक साठे आणि कॅप्टन अखिलेश कुमार या दोघांचाही मृत्यू झाला आहे.
#AirIndiaCrashF.jpg
#AirIndiaCrashF.jpg

नवी दिल्ली : एअर इंडिया एक्स्प्रेसचे दुबईहून आलेले विमान काल रात्री कोझिकोड आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना कोसळले होते. यातील मृतांची सख्या 18 झाली आहे. यात दोन पायलटांचा समावेश आहे. 40 पेक्षा अधिक प्रवाशी गंभीर जखमी आहेत. अपघातात प्रवाशांचे जीव वाचविण्याचा प्रयत्न करणारे पायलट कॅप्टन दीपक साठे आणि कॅप्टन अखिलेश कुमार या दोघांचाही मृत्यू झाला आहे. दीपक साठे हे फायटर पायलट होते. ते पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)च्या 58 व्या तुकडीचे विद्यार्थी होते. 

वायु सेना अकादमीकडून स्वॉर्ड ऑफ ऑनर पुरस्कार प्राप्त कॅप्टन दिपक साठे यांनी मिग विमाने सर्वाधिक वेळा चालवली होती. या दोन्ही पायलट कॅप्टननी आपला जीव गमावत अनेक प्रवाशांचे प्राण वाचविले आहेत. या अपघाताच्या वेळेस 10 लहान मुले, 184 प्रवाशी, दोन पायलट, चार विमान प्रशासनाचे कर्मचारी होते. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाकडून मदतकार्य वेगाने सुरू आहे. एनडीआरएफचे पथकही पोहचले आहे. याविषयी मल्लपुरमचे पोलीस अधीक्षक अब्दुल करीम म्हणाले की, दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी मदत कार्य सुरू आहे. 

ही दुर्घटना घडली त्यावेळी मुसळधार पाऊस पडत होता. या प्रकरणी केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. त्यांनी पोलिसांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर मदत कार्य वेगाने करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन स्थितीचा आढावा घेतला आहे. कोझिकोड आणि मल्लपुरमचे जिल्हाधिकारी आणि पोलीस महानिरीक्षक अशोक यादव घटनास्थळी पोचले आहेत. 

ते मदतकार्यात सहभागी झाले असून, त्यावर देखरेखही ठेवत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले. याविषयी बोलताना राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे महासंचालक एस.एन.प्रधान म्हणाले की, कोझिकोड विमानतळावर टेबलटॉप धावपट्टी आहे. या दुर्घटनेत काही प्रवासी जखमी झाले आहेत. काही जण बेशुद्ध पडले आहेत.  कोझिकोडमध्ये विमान अपघात झाल्याने मी दु:खी झालो आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त करतो, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.   
 Edited  by : Mangesh Mahale  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com