बाबरी निकालानंतर ओवेसी म्हणाले, वही कातिल, वही मुंसिफ अदालत उसकी - aimim chief asduddin owaisi criticizes bjp government over babri verdict | Politics Marathi News - Sarkarnama

बाबरी निकालानंतर ओवेसी म्हणाले, वही कातिल, वही मुंसिफ अदालत उसकी

वृत्तसंस्था
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

बाबरी पाडल्याप्रकरणी न्यायालयाने लालकृष्ण अडवानींसह 32 जणांची न्यायालयाने मुक्तता केली आहे. या निकालावरुन असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपला सरकारला लक्ष्य केले आहे. 

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्यासह 32 जणांची बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. याचवेळी या निर्णयाबद्दल एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याचवेळी हा भारतीय न्यायव्यवस्थेसाठी काळा दिवस असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

अयोध्येत 6 डिसेंबर 1992 रोजी लाखो कारसेवकांच्या उपस्थित बाबरी मशीद पाडण्यात आली होती. त्यावेळी देशात काँग्रेसचे सरकार होते आणि पी. व्ही. नरसिंह राव हे पंतप्रधान होते. अयोध्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी निकाल दिला होता. त्यानंतर राम मंदिर भूमिपूजनचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला होता. वास्तविक राम मंदिराबाबत निकाल लागल्याने आजचा निकालही अपेक्षित होता, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) न्यायालयासमोर 351 साक्षीदार आणि सुमारे 600 कागदपत्रे पुरावा म्हणून सादर केली होती. न्यायालयात 48 जणांविरोधात आरोप निश्‍चित करण्यात आले मात्र, त्यापैकी 16 जणांचा खटला सुरु असताना मृत्यू झाला आहे. सोळाव्या शतकातील ही मशीद पाडण्यासाठी आरोपींनी कारस्थान रचले आणि कारसेवकांना मशीद पाडण्यासाठी चिथावणी दिली, असा आरोप सीबीआयने केला होता. 

या निकालावर बोलताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, हा भारतीय न्यायव्यवस्थेसाठी काळा दिवस आहे. आता न्यायालय म्हणते की ,कोणताही कट आखला नव्हता. कट नसल्याचे सिद्ध करण्यासाठी महिन्यातील किती दिवस आधी तयारी करावी लागते याची माहिती मला न्यायालयाने द्यावी. या प्रकरणी मुद्दा न्यायाचा आहे. बाबरी मशीद पाडल्यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींना शिक्षा व्हायला हवी होती. मात्र, आतापर्यंत त्यांना याचे बक्षीसच मिळाले आहे. भाजप सत्तेत असण्यासह हेच कारण आहे. 

याविषयी ओवेसी यांनी ट्विटवर म्हटले आहे की, वही क़ातिल वही मुंसिफ़ अदालत उस की वो शाहिद बहुत से फ़ैसलों में अब तरफ़-दारी भी होती है. 

अडवानी आणि मुरली मनोहर जोशी यांना प्रकृतीच्या कारणास्तव आज गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली होती. उमा भारती यांना कोरोनाची लागण झाली असून, कल्याणसिंह सध्या प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल आहेत. आज एकूण 16 आरोपी न्यायालयात  हजर होते. यामध्ये साध्वी ऋतंभरा, चंपत राय, विनय कटियार, ब्रिजमोहन शरणसिंह आणि इतर काही जणांचा समावेश होता.  

Edited Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख