हैदराबाद : हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचारामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने महापालिका निवडणुकीत पूर्ण जोर लावला आहे. भाजप नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये करण्यात येत असून, याला एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी उत्तर देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रचारात उतरवण्याची तयारी भाजपने केली आहे. यावर ओवेसींनी थेट भाजपला आव्हान दिले आहे.
हैदराबाद महापालिकेच्या प्रचाराला वेग आला आहे. राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. महापालिकेसाठी येत्या १ डिसेंबरला मतदान होणार असून, ४ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. भाजपने नुकतीच डुब्बक विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची एक जागा जिंकली आहे. भाजपचे उमेदवार रघुनंदन राव यांनी टीआरएसच्या सोलिपेटा सुजाता यांचा 1 हजार 470 मतांनी पराभव केला होता. यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला असून, महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.
भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रचारात उतरवण्याची तयारी केली आहे. याचा समाचार घेताना ओवेसी म्हणाले की, तुम्ही ओल्ड सिटीत प्रचारासाठी नरेंद्र मोदींना आणा. बघा मग काय होते. तुम्ही त्यांची सभा येथे आयोजित करा आणि पाहा तुम्हाला शेवटी किती जागा मिळतात.
महापालिका निवडणुकीसाठी भाजप एवढे बडे नेते मैदानात उतरवत आहे. महापालिका निवडणुकीत भाजपची भाषा विकासाची नाही. हैदराबादचा विकास आधीच झालेला असून, अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या येथे आहेत. परंतु, भाजपला हे सगळे उध्वस्त करायचे आहे. त्यांना हैदराबादचे ब्रँडनेम संपवायचे आहे, अशी टीकाही ओवेसी यांनी केली.
हैदराबादमधील ओल्ड सिटीत सर्जिकल स्ट्राईक करावा, असे विधान भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केले होते. याचा समाचार घेताना ओवेसी म्हणाले होते की, भाजपचे नेते नैराश्यग्रस्त झाले आहेत. त्यांना कोणतीच गोष्ट कळेनाशी झाली आहे. त्यांनी निश्चितपणे 'अहमुदिल्ला'मधील बिर्याणी (हे हॉटेल बीफ बिर्याणीसाठी प्रसिद्ध आहे) खावी.
यावर भाजपचे आमदार राजासिंह म्हणाले होते की, ओवेसी यांनी पोर्क बिर्याणी खावी. माझ्या परिसरात आज ही बिर्याणी वाटण्यात येत आहे. आमच्या परिसरातील वाल्मिकी समाज चांगली पोर्क बिर्याणी करतो. तुम्हाला बिर्याणी आवडत असेल तर तुम्हाला चवदार बिर्याणी मी देतो.
हैदराबाद महापालिकेसाठी टीआरएसने सगळ्या 150 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. याचवेळी भाजप 149, काँग्रेस 146, तेलगू देसम पक्ष (टीडीपी) 106, एआयएमआयएम 51, डावे पक्ष 29 जागांवर निवडणूक लढत आहेत. मागील 2016 च्या निवडणुकीत टीआरएसने 99 जागांवर विजय मिळवून सत्ता स्थापन केली होती. यावेळीही टीआरएसने सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.
Edited by Sanjay Jadhav

