मोठी बातमी : सुशांतची हत्या की आत्महत्या...24 तासांत गूढ उलगडणार

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास तीन केंद्रीय यंत्रणा करीत आहेत. सुशांतच्या मृत्यूचे गूढ आता चोवीस तासांत उलगडणार आहे.
aiims forensic team will submit report of sushant singh rajputs death on tomorrow
aiims forensic team will submit report of sushant singh rajputs death on tomorrow

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागासोबत (सीबीआय) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) तीन न्यायवैद्यक तज्ज्ञांनी सुशांतच्या मुंबईतील घराची तपासणी केली होती. याचबरोबर सुशांतच्या व्हिसेराची तपासणीही 'एम्स'च्या पथकाने केली आहे. हे पथक सीबीआयला उद्या (ता.20) अहवाल देणार आहे. यामुळे सुशांतची हत्या की आत्महत्या याचा नेमका उलगडा होणार आहे. या अहवालावर आता सीबीआयची संपूर्ण भिस्त आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणारे सीबीआयचे पथक दिल्लीला परतले आहे. याचबरोबर या प्रकरणी सीबीआयला तपासात मदत करण्यासाठी मुंबईला गेलेले एम्सच्या न्यायवैद्यक तज्ज्ञांचे पथकही दिल्लीत परतले आहे. एम्सच्या पथकाने हा अहवाल तयार केला असून, हे पथक उद्या आपला अहवाल सीबीआयकडे सुपूर्द करेल. सीबीआयने सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या कूपर रुग्णालयातील डॉक्टरांचीही चौकशी केली होती.  

सीबीआयने दोन वेळा सुशांतच्या मृत्यूच्या वेळचा घटनाक्रम त्याच्या फ्लॅटमध्ये तयार करुन पुन्हा तपासला आहे. त्यानंतर सीबीआयच्या पथकासमवेत 'एम्स'च्या तीन न्यायवैद्यक तज्ञांनी नुकतीच मुंबईतील सुशांतच्या घराची तपासणी केली होती. या वेळी पथकाने नीरज, केशव आणि सिद्धार्थ या तिघांना सोबत नेले होते. तसेच, सुशांतची बहीण मितू सिंह हिचीही या वेळी उपस्थिती होती. फ्लॅट आणि इमारतीच्या छताची काही काळ तपासणी त्यांनी केली होती. 

सुशांतप्रकरणी दिल्लीतील 'एम्स'चे न्यायवैद्यक विभाग तपासात मदत करीत आहे. या पथकाने सुशांतच्या मृत्यूची वेळ शवविच्छेदन अहवालात नसल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सुशांतच्या मृत्यूचे नेमके कारण शोधून याचा अहवाल एम्सचे पथक सीबीआयला देणार आहे. या अहवालावर आता तपास यंत्रणांची भिस्त आहे. याविषयी बोलताना 'एम्स'च्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले होते की, आमचे प्राधान्य या प्रकरणातील खुनाच्या अँगलची तपासणी करणे. याचबरोबर मृत्यू कशामुळे झाला असावा याचा शोध आम्ही घेत आहोत. 

एम्सच्या पथकाने सुशांतच्या व्हिसेराची तपासणी केली आहे. याचा अहवाल एम्सचे पथक सीबीआयला देणार आहे. यातून सुशांतवर विषप्रयोग झाला का याची माहितीही मिळेल. सुशांतच्या शरीरावरील जखमांची तपासणीही एम्सने केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

'एम्स'च्या न्यायवैद्यक विभागाच्या अहवालाबाबत भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी काही  प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी म्हटले होते की, सुशांतचा मृत्यू हा आत्महत्या की हत्या होता हे एम्सच्या अहवालातून स्पष्ट होईल, असे काही पोलीस अधिकारी सांगत आहेत. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात त्यांच्या मृतदेह 'एम्स'च्या पथकाच्या हाती होता. मात्र, सुशांतप्रकरणी त्याच्या मृतदेहावर आधीच अंत्यसंस्कार झाले आहेत. 'एम्स'चे पथक केवळ कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी काय केले अथवा नाही याबद्दल सांगू शकते.  

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com