स्टेरॉईड्स घेतल्यामुळेच होतोय जीवघेणा म्युकरमायकोसिस; 'एम्स'च्या प्रमुखांचा दावा - AIIMS director Randeep Guleria says steroids misuse is causing Mucormycosis | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

स्टेरॉईड्स घेतल्यामुळेच होतोय जीवघेणा म्युकरमायकोसिस; 'एम्स'च्या प्रमुखांचा दावा

वृत्तसंस्था
शनिवार, 15 मे 2021

देशात कोरोनाचा कहर सुरू असून, रुग्णसंख्येसोबत कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढले आहेत. यातच म्युकरमायकोसिसचा आता नवीन धोका निर्माण झाला आहे. 

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा (Covid19) कहर वाढत असून, यात आता नवीन आजाराची भर पडली आहे. काळी बुरशी म्हणजेच म्युकरमायकोसिस (Mucormycosis) हा जीवघेणा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना होत आहे. या आजाराचे रुग्ण देशभरात वेगाने वाढू लागले असून, अनेक जणांचा मृत्यूही झाला आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (AIIMS) संचालक डॉ.रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी यासाठी स्टेरॉईड्सचा (Steroids) गैरवापरास कारणीभूत ठरवले आहे. 

डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, म्युकरमायकोसिस होण्यामागील प्रमुख कारण हे स्टेरॉईड्सचा गैरवापर हे आहे. कोरोनाबाधित, मधुमेह आणि इतर रुग्ण स्टेरॉईड्स घेत आहेत. यामुळे त्यांना बुरशीजन्य आजार होण्याची शक्यता अधिक आहे. हे रोखण्यासाठी आपल्याला तातडीने स्टेरॉईड्सचा गैरवापर थांबवायला हवा. हा आजार तोंड, नाक, डोळ्याची बुबुळे आणि मेंदूवर परिणाम करु शकतो. यामुळे दृष्टी जाऊ शकते आणि तो फुफ्फुसातही पसरू शकतो. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत आपण रुग्णालयात संसर्ग रोखण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक पद्घतीने नियम पाळायला हवेत. बुरशी आणि जिवाणू संसर्गाची अनेक प्रकरणे आता समोर येऊ लागली आहेत. यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे, असे डॉ. गुलेरिया यांनी सांगितले. 

देशात 24 तासांत 3 लाख 26 हजार रुग्ण 
देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 26 हजार 98 रुग्ण सापडले आहेत.  मागील 24 तासांत 3 हजार 890 जणांचा मृत्यू झाला आहे.देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 43 लाख 72 हजार 907 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 66 हजार 207 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

मागील 24 तासांत देशात 3 लाख 53 हजार 299 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. याच कालावधीत नवीन रुग्णांची संख्या 3 लाख 26 हजार 98 आहे. मागील पाच दिवसांत चार दिवस नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्याची संख्या अधिक आहे. देशातील महाराष्ट्रासह दहा राज्यांमध्ये 70.49 टक्के बरे होणारे आहेत. 

हेही वाचा : कोरोनाचा भारतीय प्रकार अधिक धोकादायक; लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी 

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 36 लाखांवर आली आहे. सक्रिय रुग्णांची जास्त असल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 36 लाख 73 हजार 802 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 15.07 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 83.83 टक्के आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटी 4 लाख 32 हजार 898 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.09 टक्के आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख