अबब..एक सीटी-स्कॅन असतो छातीच्या 300 एक्स-रे एवढा घातक! 'एम्स'च्या प्रमुखांनी सांगितले दुष्परिणाम - AIIMS director randeep guleria says ct scan and biomarkers are being misused | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

अबब..एक सीटी-स्कॅन असतो छातीच्या 300 एक्स-रे एवढा घातक! 'एम्स'च्या प्रमुखांनी सांगितले दुष्परिणाम

वृत्तसंस्था
सोमवार, 3 मे 2021

देशातील कोरोना रुग्णसंख्येत वेगाने वाढ सुरूच आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. 

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णसंख्येत वेगाने वाढ सुरूच आहे. यामुळे रुग्णालये अपुरी पडण्यासोबत आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. रुग्णालये सर्वच रुग्णांसाठी सीटी-स्कॅन आणि बायोमार्करचा सर्रास वापर करीत आहेत. या गैरवापराबद्दल दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ.रणदीप गुलेरिया यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. 

डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, सध्या सीटी-स्कॅन आणि बायोमार्करचा गैरवापर सुरू आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे सीटी-स्कॅन करण्याची कोणतीही गरज नाही. एक सीटी-स्कॅन हे छातीच्या 300 एक्स-रेएवढे असते आणि ते अतिशय घातक असते. 

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी लस घेण्याविषयी ते म्हणाले की, कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी लशीचे दोन्ही डोस घ्यावेत, अशी शिफारस आम्ही सध्या करीत आहोत. शास्त्रीय भाषेत सांगायचे झाल्यास पहिला डोस हा प्रायमिंग आहे तर दुसरा डोस हा बूस्टर डोस आहे. 

देशात 24 तासांत 3 हजार 417 मृत्यू 
देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 3 लाख 68 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 3 हजार 417 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आता दरतासाला सुमारे 142 जणांचा कोरोनामुळे बळी जात आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 99 लाख 25 हजार 604 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 18 हजार 959 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

सक्रिय रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक 
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 34 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 34 लाख 13 हजार 642 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 17.13 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन ते 81.77 टक्क्यांवर आले आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 62 लाख 93 हजार 3 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.10 टक्के आहे. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख