हे काय रॉकेट सायन्स नाही! 'एम्स'च्या प्रमुखांनी 'सिरम'च्या पूनावालांना सुनावले

देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून, रुग्णसंख्या आणि मृत्यूचे आकडे विक्रमी पातळीवर पोचलेआहेत. आता देशात लशीचा तुटवडा जाणवत आहे.
aiims chief randeep guleria targets serum adar poonawalla
aiims chief randeep guleria targets serum adar poonawalla

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून, रुग्णसंख्या आणि मृत्यूचे आकडे विक्रमी पातळीवर पोचली आहे. आता देशात लशीचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी आता लशीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणखी तीन हजार कोटी रुपयांचा निधी लागेल, अशी जाहीर कबुली दिली होती. यावरुन आता 'एम्स'चे प्रमुख डॉ.रणदीप गुलेरिया यांनी पूनावाला यांना सुनावले आहे. 

गुलेरिया यांनी म्हटले आहे की, जागतिक पातळीवर कोरोना लशीचा तुटवडा जाणवणार हे सहा महिन्यांपूर्वीचे स्पष्ट झाले होते. अनेक लशींच्या त्यावेळी चाचण्या सुरू होत्या तेव्हाच हे कळाले होते. यासाठी कोणत्याही रॉकेट सायन्सची गरज नाही. लशीचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला हे लक्षात यायला हवे. केवळ भारतालाच नव्हे तर जगाला लशीचा पुरवाठ करायचा आहे हे त्यांना माहिती होते. तसेच, मागणीही मोठी असणार हेसुद्धा आधीच उघड झाले आहे. 

त्यांनी कोठून निधी मिळवावा याविषयी मी सल्ला देणार नाही. परंतु,  त्यांना उत्पादनात वाढ करण्यासाठी निधी देण्यास अनेक गुंतवणूकदार तयार असतील. जगाला आता लस हवी आहे. आपल्याकडे सध्या ५० लशींवर वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. हे केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून नव्हे तर बाजार मूल्याचा विचार करुनही सुरू आहे, असे गुलेरिया यांनी सांगितले. 

काही दिवसांपूर्वी अदर पूनावाला म्हणाले होते की, सिरमच्या उत्पादन प्रकल्पावर मोठा ताण आला आहे. सिरमकडून दर महिन्याला 6 ते 6.5 कोटी डोसचे उत्पादन होत आहे. आतापर्यंत आम्ही केंद्र सरकारला 10 कोटी डोस दिले असून, 6 कोटी डोस निर्यात केले आहेत. देशातील प्रत्येकाला लस द्यायची झाल्यास तेवढे उत्पादन आता आम्ही सध्या घेऊ शकत नाही. सर्व जगाला लस हवी आहे. परंतु, आम्ही सध्या भारताच्या गरजेवर  लक्ष केंद्रित केले आहे. असे असले तरी प्रत्येक भारतीयाला लस देणे आम्हाला सध्या तरी शक्य होत नाही.   

सिरमकडून सवलतीच्या दरात केंद्र सरकारला कोरोना लस दिली जात आहे. यामुळे आम्हाला लशीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणखी 3 हजार कोटी रुपयांची गरज आहे. जूनपर्यंत उत्पादन वाढवायचे झाल्यास एवढा मोठा निधी लागेल. आम्ही केंद्र सरकारला 150 ते 160 रुपयांना लस देत आहोत. या लशीची सर्वसाधारण किंमत 20 डॉलर (सुमारे 1 हजार 500 रुपये) आहे. केंद्र सरकारने विनंती केल्यामुळे आम्ही सवलतीच्या दरात लस देत आहोत. यामुळे आम्हाला फारसा नफा होत नाही. याचा परिणाम लशीचे उत्पादन वाढवण्यावर होत आहे, असे पूनावाला यांनी सांगितले होते. 

आम्हाला 3 हजार कोटींचा निधी मिळाल्यास लशीचे उत्पादन तीन महिन्यांत वाढू शकेल. याबाबत आम्ही केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. केंद्र सरकारने निर्णय न घेतल्यास आम्ही बँकांकडे कर्जासाठी जाऊ, असे पूनावाला यांनी स्पष्ट केले होते. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. यातील कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर सरकारने वाढवून 6 ते 8 आठवडे केले आहे. याआधी या दोन्ही लशींसाठी दोन डोसमधील अंतर 4 आठवडे होते. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com