निवडणुकीआधी भाजपचा सहकारी पक्ष म्हणतोय, आमच्यावरील इनकम टॅक्स छापे थांबवा हो!

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. उद्या तमिळनाडूत मतदान होत आहे.
aiadmk party writes chief election commissioner against it raids
aiadmk party writes chief election commissioner against it raids

चेन्नई : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. राज्यात उद्या मतदान आहे. राज्यात प्राप्तिकर विभागाकडून (इनकम टॅक्स) छापासत्र सुरू आहे. यामुळे राज्यात भाजपचा सहकारी व सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्षही त्यांच्या मंत्र्यांवर सुरू असलेल्या छाप्यांमुळे वैतागला आहे. अखेर अण्णाद्रमुकने या प्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे धाव घेतली आहे. या छाप्यांमागे राजकीय हेतू असल्याचा आरोपही अण्णाद्रमुकने केला आहे. 

अण्णाद्रमुकने या प्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, राजकीय हेतूने आमचे मंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाचे छापासत्र सुरू आहे. निवडणूक आयोगाने यात हस्तक्षेप करुन हे छापे तातडीने थांबवावेत. द्रमुक आणि काँग्रेसचे नेते वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांवर प्रभाव टाकून आमच्या नेत्यांवर कारवाई करायला भाग पाडत आहेत. यामुळे मागील काही दिवसांपासून आमच्या अनेक नेत्यांना प्रचार करायला बाहेर पडता आले नाही. 

स्टॅलिन यांच्या जावयावरही याआधी छापे 
द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांच्या जावयाच्या घरावर प्राप्तिकर विभागाने नुकतेच छापे मारले होते. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. स्टॅलिन यांनी या प्रकरणी राज्य आणि केंद्र सरकारसह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले आहे. प्राप्तिकर विभागाने स्टॅलिन यांची मुलगी सेंथामाराई आणि जावई सबारीसन यांच्याशी निगडित चार ठिकाणी छापे मारले होते. 

याविषयी बोलताना स्टॅलिन म्हणाले होते की, अशा प्रकारांमुळेच जनता ६ एप्रिलला स्पष्ट कौल देणार आहे. मी एम.के.स्टॅलिन आहे. पंतप्रधान मोदींना माहिती असायला हवे की आम्ही तुमच्यासमोर झुकण्यासाठी अण्णाद्रमुकचे नेते नाही आहोत. मी आज सकाळी त्रिचीवरुन चेन्नईत आल्यानंतर या कारवाईची माहिती मला मिळाली. मोदी सरकार हे राज्यातील अण्णाद्रमुक सरकारला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. मी मोदींना सांगू इच्छितो की, आमचा पक्ष द्रमुक आहे हे विसरु नका. मी कलैग्नार (ए.करुणानिधी) यांचा पुत्र असून, मी असल्या गोष्टींमुळे घाबरत नाही. 

तमिळनाडूत ६ एप्रिलला विधानसभा निवडणूक होत आहे. मतमोजणी आणि निकाल हे २ रोजी आहेत. राज्यात ६ कोटी २८ लाख २३ हजार ७४९ मतदार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. जनमत चाचण्यांचा कल द्रमुकच्या बाजूने असून, मुख्यमंत्रिपदासाठी स्टॅलिन यांच्या नावाला पसंती मिळत आहे. यामुळे सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि भाजप आघाडीने निवडणुकीसाठी आणखी ताकद लावली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com