चेन्नई : तमिळनाडूतील सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्षाचे मुख्य समन्वयक व उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम आणि मुख्यमंत्री ई.पलानीस्वामी यांनी आगामी निवडणुकीत भाजपशी आघाडी कायम राहील, अशी जाहीर घोषणा केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोरच ही घोषणा झाली होती. मात्र, यामागे खरे कारण व्ही.के. शशिकला याच असल्याचे समोर येऊ लागले आहे. शशिकला या जानेवारीमध्ये कारागृहातून सुटत असून, यानंतर तमिळनाडूत राजकीय भूकंप होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या अतिशय निकटवर्ती मानला गेलेल्या शशिकला या जानेवारी महिन्यात कारागृहातून सुटतील, असे दिसत आहे. सध्या त्या पराप्पना अग्रहार कारागृहात आहेत. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी त्यांनी 10 कोटींचा दंड न्यायालयात भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही रक्कम भरल्यानंतर 27 जानेवारीपर्यंत त्यांची कारागृहातून सुटका होऊ शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकला यांच्या सुटकेनंतर तमिळनाडूत राजकीय भूकंप होऊ शकतो. सत्ताधारी अण्णाद्रमुकमध्ये अनेक नाराज गट आहेत. ते शशिकला यांच्या पाठीशी उभे राहू शकतात. मुख्यमंत्री ई.पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांचेही दोन गट आहेत. सध्या त्यांच्यात सामोपचाराचे वातावरण असले तरी शशिकलांच्या सुटकेनंतर हे चित्र बदलू शकते.
जयललिता यांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी नुकतीच पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. यात शशिकला यांच्या सुटकेनंतर निर्माण होणाऱ्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा झाल्याचे समजते. शशिकला आणि त्यांचे पुतणे टी.टी.व्ही.दिनकरन हे दोघे एकत्र येऊन पक्षाला मोठा धक्का देऊ शकतात. यामुळे अण्णाद्रमुकचे नेते धास्तावले आहेत. याच कारणामुळे आगामी काळात निर्माण होणाऱ्या परिस्थितीत शहांचे वजन आपल्या पारड्यात पडावे हा अण्णाद्रमुकच्या नेत्यांचा प्रयत्न आहे.
यामुळेच अमित शहांच्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री स्वागताला हजर होते. शहांचे स्वागत मुख्यमंत्री के.पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी केले होते. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात पनीरसेल्वम यांनी भाजपसोबत आघाडी कायम राहील, अशी जाहीर घोषणा केली होती. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनीही हीच भूमिका घेतली. ते म्हणाले होते की, लोकसभा निवडणुकीत असलेली आघाडी विधानसभा निवडणुकीतही कायम राहील. आम्ही दहा वर्षांत चांगले सरकार दिले आहे. विधानसभेच्या 2021 मध्ये होणाऱ्या निवडणुकीतही आमची आघाडी असेल.
जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकचे भाजपशी चांगले संबंध होते. मात्र, मागील काही काळापासून त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. केवळ नाईलाजाने अण्णाद्रमुक पक्ष केंद्रात भाजपबरोबर असल्याचे चित्र आहे. भाजपच्या वेल यात्रेवरून अण्णाद्रमुकच्या नेत्यांतील मतभेद समोर आले होते. ओ. पनीरसेल्वम यांच्या बंडखोरीमागे भाजपचे केंद्रीय नेतृत्व असल्याचे त्यावेळी समोर आले होते. कोरोनाचे निमित्त करून अण्णाद्रमुक सरकारने यात्रेवर बंदी घालून अनेक भाजप नेत्यांना अटक केली होती. तरीही भाजपने यात्रा पुढे रेटली असून, 6 डिसेंबरला या यात्रेच्या समारोपानिमित्त मोठा मेळावा घेण्याची भाजपची तयारी आहे.
Edited by Sanjay Jadhav

