शहांची पाठ फिरली अन् वारेही फिरले...भाजपशी आघाडी पण सत्तेत वाटा नाही - aiadmk leaders say no to coalition government with bjp in tamilnadu | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

शहांची पाठ फिरली अन् वारेही फिरले...भाजपशी आघाडी पण सत्तेत वाटा नाही

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या तमिळनाडू दौऱ्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. पण त्यांचा दौरा आटपताच राज्यातील वेगळे चित्र दिसू लागले आहे.  

नवी दिल्ली : तमिळनाडूतील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच तमिळनाडू दौऱ्यावर होते. त्यावेळी सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्षाचे मुख्य समन्वयक व उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम आणि मुख्यमंत्री ई.पलानीस्वामी यांनी आगामी निवडणुकीत भाजपशी आघाडी कायम राहील, अशी जाहीर घोषणा केली होती. मात्र, आता अण्णाद्रमुकने भाजपला सत्तेत वाटा देण्यास नकार देत स्वबळावरच सत्ता स्थापन होईल, असे संकेत दिले आहेत. 

शहा यांच्या तमिळनाडू दौऱ्याने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. या दौऱ्यात शहांना अनेक विकासकामांचे भूमिपूजन केले होते. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकचे भाजपशी चांगले संबंध होते.  मात्र, मागील काही काळापासून त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. केवळ नाईलाजाने अण्णाद्रमुक पक्ष केंद्रात भाजपबरोबर असल्याचे चित्र आहे. 

भाजपच्या वेल यात्रेवरून अण्णाद्रमुकच्या नेत्यांतील मतभेद समोर आले होते. ओ. पनीरसेल्वम यांच्या बंडखोरीमागे भाजपचे केंद्रीय नेतृत्व असल्याचे त्यावेळी समोर आले होते. भाजपच्या वेल यात्रेला दोन्ही द्रविडी पक्षांचा तीव्र विरोध आहे. कोरोनाचे निमित्त करून अण्णाद्रमुक सरकारने यात्रेवर बंदी घालून अनेक भाजप नेत्यांना अटक केली होती. तरीही भाजपने यात्रा पुढे रेटली असून, 6 डिसेंबरला या यात्रेच्या समारोपानिमित्त मोठा मेळावा घेण्याची भाजपची तयारी आहे. 

शहांचे स्वागत मुख्यमंत्री के.पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष एल. मुरूगन यांनी केले होते. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात पनीरसेल्वम यांनी भाजपसोबत आघाडी कायम राहील, अशी जाहीर घोषणा केली होती. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनीही हीच भूमिका घेतली. ते म्हणाले होते की, लोकसभा निवडणुकीत असलेली आघाडी विधानसभा निवडणुकीतही कायम राहील. आम्ही दहा वर्षांत चांगले सरकार दिले आहे. विधानसभेच्या 2021 मध्ये होणाऱ्या निवडणुकीतही आमची आघाडी असेल.  

शहांचा दौरा आटपताच आता अण्णाद्रमुकच्या नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. सरकारमधील ज्येष्ठ मंत्री डी.जयकुमार म्हणाले की, तमिळनाडूत आघाडी सरकार स्थापन होण्याचा विचारही करता येणार नाही. आम्ही  समविचारी पक्षांशी निवडणूकपूर्व आघाडी करू. मात्र, सत्तेत सहकारी पक्षांना वाटा असणार नाही. आम्ही स्वबळावरच सत्ता स्थापन करू. द्रमुकचा पराभव करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेऊन आम्ही लढू. 

अण्णाद्रमुकने 2016 मधील विधानसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व 234 जागा लढवल्या होत्या. यात पक्षाला ऐतिहासिक विजय मिळाला होता. आताही पक्षाला विजयाची आशा आहे. मात्र, राज्यातील आतापर्यंतचा इतिहास पाहता घटक पक्षांना सरकारमध्ये स्थान न देण्याचेच प्रकार घडलेले दिसतात. यामुळे शहांचा दौरा निष्फळ ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख