शशिकलांना घेरण्याची व्यूहनीती; सरकारमधील मंत्र्यांची पोलीस महासंचालकांकडे धाव - aiadmk leaders and ministers file complaint against sasikala natrajan | Politics Marathi News - Sarkarnama

शशिकलांना घेरण्याची व्यूहनीती; सरकारमधील मंत्र्यांची पोलीस महासंचालकांकडे धाव

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

शशिकला यांच्या सुटकेने राज्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्यास सुरवात झाली आहे. 

चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांच्या सुटकेनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्यास सुरवात झाली आहे.अण्णाद्रमुकने शशिकलांना घेरण्याची व्यूहनीती आखली आहे. अण्णाद्रमुकच्या मंत्र्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे धाव घेतली आहे. यामुळे शशिकला या घरी पोचण्याआधीच अडचणीत आल्या आहेत. 

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात होत्या. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची 27 जानेवारीला सुटका झाली आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने बंगळूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना 31 जानेवारीला रुग्णालयातून सोडण्यात आले. परंतु, कोरोना संसर्गामुळे त्यांना सात दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर त्या 7 फेब्रुवारीला तमिळनाडूत परतणार आहेत. 

शशिकलांना बंगळूरमधील रुग्णालयातून घरी नेण्यासाठी अण्णाद्रमुकचा ध्वज लावलेली मोटार आली होती. या मोटारीतून त्या घरी रवाना झाल्या. यावरुन अण्णाद्रमुकमध्ये मोठा गदारोळ सुरू झाला आहे. याआधी जयललिता यांच्या मोटारीवर अण्णाद्रमुकचा ध्वज वापरला जात होता. यावरुन गदारोळ सुरू झाल्यानंतर त्यांचे भाचे व आमदार टी.टी.व्ही. दिनकरन यांनी अण्णाद्रमुक पक्ष शशिकलांचाच असल्याचा दावा केला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.  

या प्रकरणी अण्णाद्रमकचे ज्येष्ठ नेते ई.मधुसूदन यांच्यासह मंत्री सी.व्ही. शण्मुगम व डी. जयकुमार आणि पक्षाचे पदाधिकारी के.पी.मुनुस्वामी व आर.वैथीलिंगम यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतली आहे. त्यांनी शशिकलांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, शशिकलांनी मोटारीवर अण्णाद्रमुकचा ध्वज वापरणे चुकीचे आहे. पक्षाचा ध्वज केवळ अण्णाद्रमुकचे पदाधिकारी वापरू शकतात. तो वापरण्याचा अधिकार शशिकलांना नाही. त्यामुळे त्यांना अशा प्रकारे पक्षाचा ध्वज वापरण्यास मनाई करावी. 

शशिकला या पक्षाच्या सदस्य नाहीत. पक्षाच्या प्रत्येक सदस्याला दर पाच वर्षांना सदस्यत्वाचे नूतनीकरण करावे लागते. त्यांची आम्ही पक्षातून हाकलपट्टी केलेली नाही. आम्ही त्यांना पक्षातून काढण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असे मुनुस्वामी यांनी म्हटले आहे. 

शशिकलांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा धसका मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. 

शशिकला मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, नंतर कारागृहात जाण्याआधी त्यांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यामुळे पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. नंतर दोघांमध्ये समेट होऊन ते शशिकलांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांनी शशिकला तुरुंगात असताना त्यांची आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख