प्रकृती बिघडल्याने शशिकलांना तातडीने बंगळूरमधील रुग्णालयात हलवले

शशिकला यांची या महिन्यात कारागृहातून सुटका होत आहे. त्यांच्या सुटकेनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
aiadmk leader sasikala natrajan shifted to government hospital in bengaluru
aiadmk leader sasikala natrajan shifted to government hospital in bengaluru

नवी दिल्ली : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती व अण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्या व्ही.के.शशिकला यांची 27 जानेवारीला कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे. शशिकला यांच्या सुटकेला सुमारे आठवड्याचा कालावधी राहिलेला असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने बंगळूरमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. शशिकलांच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिकृतरीत्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात आहेत. शशिकला यांची शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 27 जानेवारीला सुटका होईल, अशी शक्यता आहे. त्याआधीच त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याचबरोबर राज्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.   

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकला या 27 जानेवारीला कारागृहातून बाहेर पडत आहेत. त्यांना आज अचानक कारागृहात त्रास जाणवू लागला. त्यांना ताप आला असून, त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. त्यांना बंगळूरमधील बावरींग सरकारी रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

शशिकलांच्या सुटका होण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. यामुळे मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम धास्तावले आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली आहे.

शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा धसका मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी घेतला आहे. यासाठी मुख्यमंत्री पलानीस्वामी व पनीरसेल्वम हे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोचले आहेत. त्यांनी दिल्लीतून शशिकलांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.  

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. चेन्नई मेट्रोच्या नवीन मार्गिकेच्या उद्घाटनाचे निमंत्रण देण्याचे अधिकृत कारण यामागे सांगण्यात येत आहे. मात्र, खरे कारण या शशिकला आहेत. शशिकला या 27 जानेवारीला कारागृहातून सुटणार आहेत. त्यानंतर निर्माण होणाऱ्या राजकीय परिस्थितीविषयी मोदींशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. 

कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी जाण्याआधी शशिकलांनी विश्वासू सहकारी असलेले पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रिपदी बसवले होते. नंतर तेच शशिकलांच्या विरोधात गेले. आता त्यांनी थेट शशिकलांना आव्हान दिले आहे. दिल्लीत बोलताना पलानीस्वामी म्हणाले होते की, शशिकलांना आम्ही अण्णाद्रमुध्ये प्रवेश देणार नाही. शशिकला म्हणजे काय पक्ष आहेत का? त्यांच्या सुटकेने काहीही फरक पडणार नाही. टी.टी.व्ही. दिनकरन यांच्या पक्षातील बहुतांश नेते आता अण्णाद्रमुकमध्ये परतले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com