चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांच्या सुटकेनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्यास सुरवात झाली आहे. शशिकलांना बंगळूरमधील रुग्णालयात सोडण्यात आल्यानंतर त्यांना अण्णाद्रमुकचा ध्वज लावलेल्या मोटारीतून नेण्यात आले होते. यावरुन मोठा गदारोळ सुरू झाला असून, अण्णाद्रमुकने या प्रकरणी पोलिसांकडे धाव घेतली आहे. यामुळे शशिकला या घरी पोचण्याआधीच त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात होत्या. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची 27 जानेवारीला सुटका झाली आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने बंगळूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना 31 जानेवारीला रुग्णालयातून सोडण्यात आले. परंतु, कोरोना संसर्गामुळे त्यांना सात दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर त्या 7 फेब्रुवारीला तमिळनाडूत परतणार आहेत.
कर्नाटक सीमेवरुन तमिळनाडूत एंट्री झाल्यापासून चेन्नईपर्यंत शशिकलांचे होणार जंगी स्वागत
शशिकलांना बंगळूरमधील रुग्णालयातून घरी नेण्यासाठी अण्णाद्रमुकचा ध्वज लावलेली मोटार आली होती. या मोटारीतून त्या घरी रवाना झाल्या. यावरुन अण्णाद्रमुकमध्ये मोठा गदारोळ सुरू झाला आहे. याआधी जयललिता यांच्या मोटारीवर अण्णाद्रमुकचा ध्वज वापरला जात होता. यावरुन गदारोळ सुरू झाल्यानंतर त्यांचे भाचे व आमदार टी.टी.व्ही. दिनकरन यांनी अण्णाद्रमुक पक्ष शशिकलांचाच असल्याचा दावा केला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आता अण्णाद्रमुकने या प्रकरणी पोलिसांकडे धाव घेतली आहे. जयललिता वापरत असलेला पक्षाचा ध्वज मोटारीवर वापरणे हे बेकायदा असून, शशिकलांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सालेम शहर पोलिसांकडे केली आहे. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असून, त्यात म्हटले आहे की, जयललितांनी शशिकलांची पक्षातून हकालपट्टी केली होती. मात्र., त्यांनी बेकायदेशीररीत्या अण्णाद्रमुकचा ध्वज मोटारीवर वापरला. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
शशिकलांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा धसका मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली आहे.
शशिकला मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, नंतर कारागृहात जाण्याआधी त्यांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यामुळे पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. नंतर दोघांमध्ये समेट होऊन ते शशिकलांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांनी शशिकला तुरुंगात असताना त्यांची आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.
Edited by Sanjay Jadhav

