दक्षिण दिग्विजयाचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपच्या वाट्याला फक्त २० जागा

दक्षिणेत विस्तार करण्यासाठी भाजपकडूनआक्रमक पावले टाकली जात असताना तमिळनाडूत पक्षाच्या वाट्याला केवळ 20 जागा आल्या आहेत.
AIADMK allots 20 seats for BJP in tamil nadu assembly election
AIADMK allots 20 seats for BJP in tamil nadu assembly election

चेन्नई : दक्षिणेत विस्तार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) आक्रमक पावले टाकली जात आहेत.  तमिळनाडूतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र, राज्यातील सत्ताधारी अण्णाद्रमुकने भाजपला फक्त २० जागा दिल्या आहेत. भाजपपेक्षा पीएमके या प्रादेशिक पक्षाला जास्त जागा देण्यात आल्या आहेत. कमी जागांची भरपाई करण्यासाठी कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही भाजपचा उमेदवार रिंगणात उतरणार आहे. 

राज्यातील सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्षाशी भाजपने आघाडी केली आहे. दोन्ही पक्षांत जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. जागावाटपावर मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी सत्ताधारी पक्षाकडून तर भाजपकडून पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी व राज्य प्रदेश प्रमुख एल. मुरुगन यांनी स्वाक्षरी केली. तमिळनाडूत ६ एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी सहा उमेदवारांची पहिली यादीही अण्णाद्रमुकने जाहीर केली आहे. 

आधी अण्णाद्रमुकने पट्टली मक्कल कच्छी (पीएमके) या प्रादेशिक पक्षाशी जागावाटपावर चर्चा करुन त्यांना २३ जागा दिल्या आहेत. विधानसभेच्या एकूण २३४ जागांपैकी अण्णाद्रमुककडून १७० जागा लढविल्या शक्यता आहे. मागील विधानसभा निवडणुकीत २०१६ मध्ये पक्षाने जिंकलेल्या १३४ जागांचा यात समावेश असेल. भाजपचे जागा वाटपात लक्ष राज्याच्या पश्‍चिम पट्ट्यावर आहे. या भागात अण्णाद्रमुकचे वर्चस्व असून, तेथे पक्षाचा प्रभावा वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. 

अण्णाद्रमुकने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीनुसार मुख्यमंत्री पलानीस्वामी त्यांच्या सेलम जिल्ह्यातील परंपरागत एडाप्पडी मतदारसंघातून मैदानात उतरत आहेत. तर उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम हे थेनी जिल्ह्यातील बोडिनायक्कूर येथून रिंगणात  उतरत आहेत. अण्णाद्रमुकचे ज्येष्ठ नेते व मत्स्य मंत्री डी. जयकुमार हे रोयापूरमधून लढणार आहेत. 

विधी मंत्री सी. व्ही. षण्मुगम हे उत्तर तमिळनाडूतील विल्लूरपुरम मतदारसंघातून लढणार आहेत. आमदार एस.पी. षण्मुगनाथन आणि एस. थेनमोळी यांना अनुक्रमे श्रीवैगुंडम व नीलाकोट्टई येथून उमेदवारी जाहीर झाली आहे. तमिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ २४ मे रोजी पूर्ण होत असून, मागील दहा वर्षांपासून राज्यात अण्णाद्रमुकची सत्ता आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com