सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'एक्झिट'मुळे शशिकला ठरणार 'गेम-चेंजर' - after superstar rajanikanth exit from electoral politics sasikala will be game changer | Politics Marathi News - Sarkarnama

सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'एक्झिट'मुळे शशिकला ठरणार 'गेम-चेंजर'

वृत्तसंस्था
रविवार, 31 जानेवारी 2021

शशिकला यांची तब्बल चार वर्षांनंतर कारागृहातून सुटका झाली आहे. मात्र, त्यांच्या सुटकेने राज्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्यास सुरवात झाली आहे. 

चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांची तब्बल चार वर्षांनतर कारागृहात सुटका झाली आहे. शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सुपरस्टार रजनीकांत यांची राजकीय एक्झिट ही शशिकलांच्या पथ्यावर पडेल, अशी चिन्हे आहेत. सत्ताधारी अण्णाद्रमुकचे अस्तित्व आता शशिकलांच्या भूमिकेवर अवलंबून असेल, अशी चर्चाही सुरू झाली आहे. 

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात होत्या. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची 27 जानेवारीला सुटका झाली आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने बंगळूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. 

जयललिता वापरत असलेला अण्णाद्रमुकचा ध्वज शशिकलांच्या मोटारीवर

शशिकला या मूळच्या तंजावूर नजीकच्या मन्नारगुडी येथील आहेत. तेथील थेवर समाजावर त्यांचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. याच समाजातील नेत्यांचे प्रमाण अण्णाद्रमुकमध्ये अधिक आहे. यातच सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय ऐनवेळी फिरवला आहे. यामुळे जनतेच्या मनात नवीन राजकीय पर्याय पाहण्याची आस लागली होती. तमिळनाडूत पाय रोवण्यासाठी भाजपची मदारही रजनीकांत यांच्यावर होती. अखेर भाजपला अण्णाद्रमुकशी जुळवून घ्यावे लागले आहे. 

तमिळनाडूतील या बदलत्या राजकीय परिस्थितीत शशिकला या सगळी राजकीय समीकरणे बदलतील, असे दिसत आहे. राज्यात भाजपला शिरकाव करावयाचा आहे. शशिकलांच्या सुटकेमुळे मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम धास्तावले आहेत. त्यांनी दिल्लीत जाऊन भाजप नेते अमित शहांची भेट घेतली होती. शशिकलांच्या सुटकेनंतर अण्णाद्रमुकला एकसंध ठेवण्यासाठी दोघे भाजपची मदत घेत आहेत. या परिस्थितीचा फायदा घेऊन भाजपने अखेर अण्णाद्रमुकसोबत आघाडी पदरात पाडून घेतली आहे. 

शशिकला यांचे जयललिता यांच्यासोबत अनेक दशके घनिष्ठ संबंध होते. शशिकलांचे पती नटराजन यांच्या जनसंपर्क कौशल्याचा जयललितांना मोठा फायदा झाला होता. एम.जी.रामचंद्रन यांच्या निधनानंतर शशिकला आणि त्यांच्या नातेवाईकांनी खंबीरपणे जयललितांच्या पाठीशी उभे राहून साथ दिली होती. त्यावेळी जयललितांवर आलेल्या सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी शशिकला भक्कमपणे त्यांच्यासोबत उभ्या होत्या. याचबरोबर नटराजन यांनी जयललितांच्या राजकीय कारकिर्दीत किंगमेकरची भूमिका नंतरच्या काळात बजावली होती.  

शशिकलांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा धसका मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. 

शशिकला मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, नंतर कारागृहात जाण्याआधी त्यांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यामुळे पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. नंतर दोघांमध्ये समेट होऊन ते शशिकलांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांनी शशिकला तुरुंगात असताना त्यांची आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख