हैदराबाद : काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन नुकताच अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता काँग्रेसचा राजीनामा दिलेल्या आणि ‘लेडी अमिताभ’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री विजयाशांती भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. विजयाशांती या उद्या (ता.7) भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
Vijayashanti Ji will formally join BJP tomorrow. She met with Amit Shah ji today. All those whom KCR sidelined, will join BJP: BJP leader G Vivek Venkatswamy in Delhi https://t.co/gmZmIb0150 pic.twitter.com/lbKCUEtitv
— ANI (@ANI) December 6, 2020
हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीतील भाजपने मुसंडी मारली आहे. भाजपचा राज्यात आक्रमकपणे होणार विस्तार पाहून तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) आणि काँग्रेसमधील असंतुष्ट नेते भाजपकडे आकर्षित होऊ लागले आहेत. महापालिका निवडणुकीनंतर काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या विजयाशांती या भाजपमध्ये जाणार असल्याची अटकळ बांधली जात होती. अखेर हा अंदाज खरा ठरला आहे.
विजयाशांती यांनी 1990 च्या दशकात भाजपमध्ये प्रवेश करुन राजकारणाची सुरवात केली. त्यांनंतर त्यांनी टीआरएसमध्ये प्रवेश केला. काही काळानंतर त्या काँग्रेसमध्ये गेला. विजयाशांती यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. या वेळी तेलंगण भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंडी संजयकुमार आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री जी.किशन रेड्डी उपस्थित होते.
टीआरएसच्या कारभाराबाबत जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेला असंतोष आणि निवडणुकीत काँग्रेसचे झालेले पानिपत यामुळे या दोन्ही पक्षांमधील असंतुष्ट नेते भाजपमध्ये राजकीय भविष्य आजमावण्याचा विचार करत आहेत. यासाठी ते भाजप नेतृत्वाच्या संपर्कात आहेत.
काँग्रेसच्या राज्यातील आणखी एका बड्या नेत्याला भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न पक्षाचे एक सरचिटणीस करत आहेत. काँग्रेसबरोबर सत्ताधारी टीआरएसमधील नेत्यांनाही फोडण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. नलगोंडा जिल्ह्यातील टीआरएसचे दोन नेते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असून, त्यांची एका बड्या भाजप नेत्याशी चर्चाही झाली आहे.
Edited by Sanjay Jadhav

