अभिनेत्रीची सकाळी काँग्रेसला सोडचिठ्ठी अन् दुपारी भाजपमध्ये प्रवेश - after quitting congress actress khushboo sunder joins bjp | Politics Marathi News - Sarkarnama

अभिनेत्रीची सकाळी काँग्रेसला सोडचिठ्ठी अन् दुपारी भाजपमध्ये प्रवेश

वृत्तसंस्था
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. पक्षातील गटबाजीला कंटाळून बाहेर पडल्याचे त्यांनी म्हटले होते. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

नवी दिल्ली : दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी आज सकाळी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. पक्षातील नेत्यांच्या एकारधिकारशाहीला कंटाळून पक्ष सोडत असल्याचे त्यांनी म्हटले होते. काँग्रेसनेही तातडीने त्यांना प्रवक्ते पदावरुन हटवले होते. यानंतर दुपारीच खुशबू या भाजपमध्ये डेरेदाखल झाल्या आहेत. 

खुशबू यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना राजीनामा पाठवला होता. त्यांनी म्हटले होते की, पक्षात वरिष्ठ पातळीवर बसलेल्या काही नेत्यांचा जमिनीशी आणि वास्तवाशी कोणताही संबंध नाही. पक्षासाठी काम करण्याची इच्छा असलेल्या माझ्यासारख्या व्यक्तींना डावलले जात आहे अथवा बाजूला फेकले जात आहे. 

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री खूशबू यांनी 2010 मध्ये द्रमुक पक्षात प्रवेश करुन राजकीय कारकिर्द सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी द्रमुक सोडून २०१४ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिलेली नव्हती. तसेच, राज्यसभेवरही पाठविले नव्हते. त्यामुळे त्या नाराज असल्याचे बोलले जात होते. 

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणांवरुन नुकतेच खुशबू यांनी भाजपला धारेवर धरले होते. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही अनेक वेळा त्यांनी थेट टीका केली आहे. केंद्र सरकारविरोधातही त्यांचा सातत्याने हल्लाबोल सुरू होता. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांनी केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाला पाठिंबा दिला होता. तेव्हापासून त्या काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली होती. 

काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच खुशबू यांनी दिल्लीत भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी बोलताना त्या म्हणाल्या की, भाजप माझ्यासाठी काय करेल, अशा प्रकारच्या अपेक्षा मला पक्षाकडून नाहीत. याचवेळी भाजप देशातील जनतेसाठी काय करु शकतो, अशी माझी अपेक्षा आहे. जेव्हा 128 कोटी जनता एका व्यक्तीवर म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवते त्यावेळी ते अतिशय योग्य काम करीत आहेत, हे स्पष्ट होते. 

खुशबू सुंदर या दक्षिणात्य अभिनेत्री आहेत. त्यांनी दोनशेपेक्षा जास्त चित्रपटांत अभिनय केला आहे. त्या दूरचित्रवाणीवरील अनेक लोकप्रिय शो करीत आहेत. त्यामुळे तमिळनाडूतील घराघरांत त्या पोचलेल्या आहेत. त्यांना तमिळनाडू राज्य सरकारचा चित्रपट पुरस्कार  मिळाला आहे.

बॉलीवूडमध्येही त्यांनी काही चित्रपटांत अभिनय केला आहे. अभिनेते जावेद जाफरी यांच्याबरोबर त्यांनी मेरी जंग या चित्रपटात काम केले होते. त्यावेळी त्यांचे 'बोल बेबी बोल...रॉक अँड रोल...' हे गाणे गाजले होते. जॅकी श्रॉफ बरोबर त्यांनी 'जानू' या चित्रपटात मुख्य भूमिका केली होती. गोविंदाबरोबर त्यांनी 'तन-बदन' चित्रपटात मुख्य भूमिका केली होती. आमीर खान आणि माधुरी दीक्षित यांच्या भूमिका असलेल्या 'दिवाना मुझसा नही' या चित्रपटातही त्यांची भूमिका होती. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख