केसीआर अन् ओवेसींची बिर्याणी अन् निवडणूकही एकत्र..!

हैदराबाद महापालिका निवडणुकीत टीआरएस सर्वांत मोठा पक्ष ठरला असला तरी भाजपने जोरदार मुसंडी मारून लक्ष वेधले आहे. आता महापालिकेत सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे.
after ghmc results g kishan reddy says kcr and owaisi eat birayani together
after ghmc results g kishan reddy says kcr and owaisi eat birayani together

हैदराबाद : हैदराबाद महापालिकेत सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीने (टीआरएस) सर्वाधिक जागा मिळवल्या असून, भाजपनेही मुसंडी मारली आहे. एआयएमआयएम तिसऱ्या स्थानी आहे. मात्र, टीआरएसला सत्तास्थापनेसाठी दुसऱ्या पक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. यावरुन भाजप नेते व केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी टीआरएसचे प्रमुख व मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (केसीआर) आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर निशाणा साधला आहे. 

हैदराबाद महापालिकेच्या 150 पैकी 149 जागांसाठी 1 डिसेंबरला मतदान झाले होते. एका जागेवर मतदाराचे चिन्ह चुकीचे असल्याने मतदान रद्द करण्यात आले होते. मतदारांनी आज मतदानासाठी फारसा उत्साह दाखवला नाही. मतदानाची टक्केवारी 46.55 टक्के होती. मागील महापालिका निवडणुकीत 2016 मध्ये मतदानाची आकडेवारी 45.27 टक्के होती. 

महापालिकेचा निकाल काल जाहीर झाला. यात टीआरएसने सर्वाधिक 55 जागा मिळवल्या. मात्र, बहुमताच्या आकड्यापासून पक्ष दूरच आहे. भाजप 48 जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे. एआयएमआयएम 44 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. महापालिकेत सत्तास्थापनेसाठी टीआरएसला दुसऱ्या पक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. 

टीआरएस आणि एआयएमआयएममध्ये आघाडी होऊन ते महापालिकेत सत्ता स्थापन करतील, अशी शक्यता आहे. यावर बोलताना केंद्रीय गृह राज्यमंत्री रेड्डी म्हणाले की, मुख्यमंत्री राव आणि खासदार ओवेसी एकत्र बिर्याणी खातात आणि निवडणुकाही एकत्र लढतात. हैदराबाद हे मिनी तेलंगण आहे. येथील जनतेने भाजपला पाठिंबा देत 48 जागांचा आशीर्वाद दिला आहे. जनता ओवेसींच्या विरोधात आहे. राज्यात 2023 मध्ये सत्ता स्थापन करण्यापासून भाजपला ना ओवेसी ना राव रोखू शकतात.

भाजपने नुकतीच डुब्बक विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची एक जागा जिंकली होती. भाजपचे उमेदवार रघुनंदन राव यांनी तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) सोलिपेटा सुजाता यांचा 1 हजार 470 मतांनी पराभव केला होता. यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला होता आणि महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली होती.  

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा प्रचारात उतरले होते. त्यांनी वादग्रस्त भाग्यलक्ष्मी मंदिरापासून प्रचाराचा सुरवात केली होती. हे मंदिर हैदराबादमधील प्रसिद्ध चारमिनारच्या पायथ्याशी आहे. भारतीय पुरातत्व विभागाने या मंदिराचे बांधकाम अवैध ठरवले होते. तसेच, उच्च न्यायालयानेही या मंदिराचा विस्तार करण्यास मनाई घातली होती. याचबरोबर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही प्रचार केला होता. 

हैदराबाद महापालिकेसाठी टीआरएसने सगळ्या 150 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. याचवेळी भाजप 149, काँग्रेस 146, तेलगू देसम पक्ष (टीडीपी) 106, एआयएमआयएम 51, डावे पक्ष 29 जागांवर निवडणूक लढत आहेत. मागील 2016 च्या निवडणुकीत टीआरएसने 99 जागांवर विजय मिळवून सत्ता स्थापन केली होती. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com