after batra hospital ran out of oxygen 12 patients dies including doctor
after batra hospital ran out of oxygen 12 patients dies including doctor

धक्कादायक : दिल्लीत ऑक्सिजनअभावी 12 रुग्णांनी गमावले प्राण; मृतांमध्ये डॉक्टरचाही समावेश

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, दिल्लीत आरोग्य व्यवस्था कोलमडून पडल्याचे चित्र आहे. दिल्लीतील बत्रा रुग्णालयात आज ऑक्सिजनअभावी 12 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये रुग्णालयातील एका डॉक्टरचाही समावेश आहे. आठवडाभरात दुसऱ्यांदा या रुग्णालयातील ऑक्सिजन संपला असून, रुग्णालयात सध्या 220 जण ऑक्सिजनवर आहेत. 

याबाबत बत्रा रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. सुधांशू बंकट म्हणाले की, पुढील 24 तास आमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. वेळेवर ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यास आणखी रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो. आधीच ऑक्सिजनची पातळी खालावलेल्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्यास त्यांना जिवंत ठेवणे खूप अवघड असते. आमच्यासाठी पुढील 24 ते 48 तास महत्वाचे आहेत. सध्या आमच्या रुग्णालयात 220 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. 

रुग्णालयात आज सकाळी ऑक्सिजनअभावी 12 जणांचा मृत्यू झाला. यातील 6 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. यात रुग्णालयातील डॉक्टर आर.के.हिमतानी यांचा मृत्यू झाला. यामुळे दिल्लीतील आरोग्य व्यवस्थेवरील संकट दिवसेंदिवस भीषण बनत चालल्याचे दिसत आहे. 

दिल्लीतील ऑक्सिजन टंचाईवर आज अकराव्या दिवशी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यासंदर्भात बत्रा रुग्णालयाचे उच्च न्यायालयाला माहिती दिली. रुग्णालयाने सांगितले की, कोरोनाच्या लाटेमुळे रुग्णसंख्या वाढली आहे. ऑक्सिजनच्या टंचाईमुळे रुग्णालयातील 230 रुग्ण ऑक्सिजन पुरवठ्याअभावी 80 मिनिटे होते. आमच्याकडील ऑक्सिजन सकाळी 11.45 वाजता संपला आणि ऑक्सिजनचा पुरवठा दुपारी 1.30 वाजता आला. आम्ही 1 तास 20 मिनिटे ऑक्सिजन पुरवठ्याविना होतो. 

यात कुणाचा मृत्यू झाला नसेल, अशी आशा आहे, असे उच्च न्यायालय म्हणाले. यावर रुग्णालयाने सांगितले की, आम्ही 12 रुग्ण गमावले असून, यात आमच्याच रुग्णालयातील एका डॉक्टरचाही समावेश आहे.

देशात 24 तासांत 4 लाख रुग्ण 
देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 4 लाख 1 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 3 हजार 523 जणांचा मृत्यू झाला आहे. जगामध्ये भारतात सर्वाधिक रुग्ण एकाच दिवसांत सापडण्याचा उच्चांक नोंदवला गेला आहे. देशात आता दरतासाला सुमारे 146 जणांचा कोरोनामुळे बळी जात आहे. मागील 24 तासांत देशात 3 हजार 523 मृत्यू झाले आहेत. यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रातील असून, 828 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ दिल्ली 375, उत्तर प्रदेश 332, छत्तीसगड 269, कर्नाटक 217, गुजरात 173, राजस्थान 155, उत्तराखंड 122, झारखंड 120, पंजाब 113 आणि तमिळनाडूतील 113 मृत्यूंचा समावेश आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com