धक्कादायक : कोरोनाबाधिताच्या अंत्यसंस्काराला उपस्थित गावातील 150 जणांपैकी 21 जणांचा मृत्यू - after attending funeral of covid positive patient 21 persons die in rajasthan | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

धक्कादायक : कोरोनाबाधिताच्या अंत्यसंस्काराला उपस्थित गावातील 150 जणांपैकी 21 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
शनिवार, 8 मे 2021

देशातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, मृत्यूचे आकडे आता विक्रमी पातळीवर पोचले आहेत. 

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Covid19) रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, मृत्यूचे आकडे विक्रमी पातळीवर पोचले आहेत. यातच एका कोरोना रुग्णाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या 150 जणांपैकी 21 जणांचा मृत्यू झाला आहे. शासकीय यंत्रणेने मात्र, यातील चौघांचा मृत्यू कोरोनाने झाल्याचे म्हटले असून, इतरांच्या मृत्यूचे वेगळे कारण दिले आहे. (after attending funeral of covid positive 21 persons die in rajasthan) 

ही घटना राजस्थानमधील सिकर जिल्ह्यात घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील खीरा गावात एका व्यक्तीचा 21 एप्रिलला कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याच्या दफनावेळी 150 लोक उपस्थित होते. कोरोनाविषयक कोणत्याही उपाययोजना न पाळता त्या व्यक्तीचे दफन करण्यात आले. मृतदेहावरील प्लॅस्टिक बाजूला काढण्यात आले होते आणि अनेक जणांनी मृतदेह दफन करताना त्याला हात लावला होता. 

अंत्यसंस्कारानंतर काही दिवसांतच गावातील लोकांचे मृत्यू होण्यास सुरवात झाली. आतापर्यंत 21 गावकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. याबद्दल बोलताना उपविभागीय अधिकारी कुलराज मीना म्हणाले की, गावातील 21 मृत्यूपैकी केवळ 3 ते 4 मृत्यू कोरोनामुळे झालेले आहेत. बहुतांश मृत्यू हे वार्धक्यामुळे झाले आहेत. गावातील मृत्यू झालेल्या कुटुंबामधील 147 व्यक्तींचे आम्ही नमुने गोळा केले आहेत. कोरोनाच्या सामूहिक संसर्गामुळे हे मृत्यू झाले का याची तपासणी आम्ही करीत आहोत. 

हेही वाचा : यामुळेच मोदी सरकार कोरोनासमोर हरले...

खीरा हे गाव काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह दोस्तारा यांच्या विधानसभा मतदारसंघात आहे. त्यांनीच सोशल मीडियावर या अंत्यसंस्काराची आणि त्यानंतर झालेल्या मृत्यूंची माहिती दिली होती. परंतु, नंतर त्यांनी ती सोशल मीडियावरुन काढली टाकली होती. त्यांनी म्हटले होते की, कोरोनामुळे 20 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण बाधित आहेत. 

याबाबत सिकरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी अजय चौधरी म्हणाले की, या संपूर्ण प्रकाराबद्दल स्थानिक प्रशासनाकडे अहवाल मागितला आहे. हा अहवाल मिळाल्यानंतर याबाबत बोलता येईल. 

देशात 24 तासांत 4 लाखांहून अधिक रुग्ण 
देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 18 लाख 92 हजार 676 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 38 हजार 270 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 4 लाख 1 हजार 78 रुग्ण सापडले आहेत.  मागील 24 तासांत 4 हजार 187 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख