वडिलांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला अन् पुत्र म्हणाला, ही तर नवीन सुरवात!

पंजाबमध्ये मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी राजीनामा दिला आहे. यानंतर त्यांचे पुत्र रानिंदरसिंग यांनी केलेल्या ट्विटमुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
after amarinder singh resignation his son hints about new begining
after amarinder singh resignation his son hints about new begining

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांना राजीनामा दिला आहे. नवीन मुख्यमंत्री  निवडीसाठी काँग्रेस (Congress) हाय कमांडने तातडीने आज सायंकाळी आमदारांची बैठक बोलावली आहे. राजीनामा दिल्यानंतर अमरिंदरसिंग यांनी मनातील खदखद व्यक्त करीत भविष्यात वेगळा निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. असे असताना त्यांचे पुत्र रानिंदरसिंग यांच्या ट्विटने वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.  

अमरिंदरसिंग यांनी आज राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला. या वेळी त्यांच्यासोबत पुत्र रानिंदरसिंग हे उपस्थित होते. यानंतर त्यांनी केलेल्या ट्विटमुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. रानिंदरसिंग यांनी म्हटले आहे की, माझ्या वडिलांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यावेळी मी राजभवनावर उपस्थित होतो. याचा मला अतिशय अभिमान आहे. आमच्या कुटुंबाच्या प्रमुखांची आता एक नवीन सुरवात होत आहे. 

रानिंदरसिंग यांच्या ट्विटनंतर अमरिंदरसिंग यांच्या पुढील राजकीय प्रवासाबाबत वेगवेगळी शक्यता वर्तविली जात आहे. अमरिंदरसिंग यांची नवीन सुरवात म्हणजे नेमके काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, रानिंदरसिंग यांची नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे. सलग चौथ्यांदा ते अध्यक्षपदी निवडून आले आहेत. त्यांनी बहुजन समाज पक्षाचे श्यामसिंह यादव यांचा पराभव केला. 

आमदारांच्या तातडीच्या बैठकीबाबत पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी ट्विट केले आहे. पक्षाच्या अनेक आमदारांनी तातडीने बैठक बोलावण्याची मागणी केली होती. यानुसार आज सायंकाळी ही बैठक होत आहे. पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीने ही सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व आमदारांनी उपस्थित राहावे, असे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसने अचानक बैठक बोलावल्याने राज्यात मुख्यमंत्री बदल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पक्षाच्या अनेक आमदारांनी अमरिंदरसिंगांनी बदलण्याची मागणी लावून धरली होती. त्यांचे वारंवार पक्ष नेतृत्वाशीही खटके उडू लागले होते. पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणूक होत असल्याने पक्ष नेतृत्वाला लवकरात लवकर या वादावर तोडगा काढायचा आहे. आजच्या बैठकीत नवीन मुख्यमंत्री निवडला जाणार आहे. यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com