सुशांतची आत्महत्या की हत्या...'एम्स'च्या अहवालानंतरही सीबीआयला कोडे उलगडेना

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तीन केंद्रीय यंत्रणा तपास करीत आहेत. मात्र, त्याची आत्महत्या की हत्या यापर्यंतही साडेतीन महिन्यातकोणतीही यंत्रणा पोचलेली नाही.
after aiims forensic report cbi is examining other evidence for conclusion
after aiims forensic report cbi is examining other evidence for conclusion

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागासोबत (सीबीआय) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) तीन न्यायवैद्यक तज्ज्ञांनी सुशांतच्या मुंबईतील घराची तपासणी केली होती. या पथकाने सीबीआयला आपला अहवाल दिला आहे. 'एम्स'च्या अहवालानंतरही सीबीआयसमोरील प्रश्नचिन्ह कायम असून, सुशांतची हत्या की आत्महत्या हे ठरवता येत नसल्याचे समोर आले आहे. सुशांत हा 14 जूनला मृतावस्थेत आढळला होता आणि साडेतीन महिन्यांनंतरही त्याच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणारे सीबीआयचे पथक दिल्लीला परतले आहे. याचबरोबर या प्रकरणी सीबीआयला तपासात मदत करण्यासाठी मुंबईला गेलेले 'एम्स'च्या न्यायवैद्यक तज्ज्ञांचे पथकही दिल्लीत परतले आहे. 'एम्स'च्या पथकाने अहवाल तयार करुन तो सीबीआयकडे सुपूर्द केला. सीबीआयने याआधी सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या कूपर रुग्णालयातील डॉक्टरांचीही चौकशी केली होती.  

सीबीआयने दोन वेळा सुशांतच्या मृत्यूच्या वेळचा घटनाक्रम त्याच्या फ्लॅटमध्ये तयार करुन पुन्हा तपासला आहे. त्यानंतर सीबीआयच्या पथकासमवेत 'एम्स'च्या तीन न्यायवैद्यक तज्ञांनी नुकतीच मुंबईतील सुशांतच्या घराची तपासणी केली होती. या वेळी पथकाने नीरज, केशव आणि सिद्धार्थ या तिघांना सोबत नेले होते. तसेच, सुशांतची बहीण मितू सिंह हिचीही या वेळी उपस्थिती होती. फ्लॅट आणि इमारतीच्या छताची काही काळ तपासणी त्यांनी केली होती. 

सुशांतप्रकरणी दिल्लीतील 'एम्स'चे न्यायवैद्यक विभाग तपासात मदत करीत आहे. या पथकाने सुशांतच्या मृत्यूची वेळ शवविच्छेदन अहवालात नसल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सुशांतच्या मृत्यूचे नेमके कारण शोधून याचा अहवाल 'एम्स'चे पथक सीबीआयला देणार होते. या अहवालावर आता तपास यंत्रणांची भिस्त होती. 

सीबीआयकडे 'एम्स'च्या पथकाने अहवाल सादर केला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेला सुशांतचा शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपासणी करुन 'एम्स'च्या पथकाने हा अहवाल तयार केला आहे. सीबीआय आता या अहवालाचा अभ्यास करीत आहे. या प्रकरणातील इतर पुराव्यांच्या आधारे अंतिम निष्कर्षापर्यंत पोचण्याचा प्रयत्न सीबीआय करीत आहे. 'एम्स'च्या अहवालात सुशांतवर विषप्रयोग झाला नसल्याची बाबही नमूद करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

याविषयी बोलताना 'एम्स'च्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले की, सुशांतची हत्या की आत्महत्या हे आता सीबीआयनेच ठरवायचे आहे. सीबीआय या प्रकरणी सर्व माहिती उघड करेल. आम्हाला माहिती नाही की हे प्रकरण कोणत्या दिशेला जात आहे.  

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com