समोर पराभव दिसू लागल्याने भाजपकडून आमदारांचा घोडेबाजार सुरू - Afraid of bypoll results BJP trying to buy what they can get says Kamal Nath | Politics Marathi News - Sarkarnama

समोर पराभव दिसू लागल्याने भाजपकडून आमदारांचा घोडेबाजार सुरू

वृत्तसंस्था
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

मध्य प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. 

भोपाळ : मध्य प्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत असून, मिनी विधानसभा असलेल्या या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपवर घोडेबाजाराचा आरोप केला आहे. पराभव समोर दिसू लागल्याने भाजपने असे प्रकार सुरू केले आहेत, अशी टीका त्यांनी केली. 

काँग्रेसचे आमदार राहुल लोधी यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावरुन कमलनाथ यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले. विधानसभा पोटनिवडणुकांचा निकाल 10 नोव्हेंबरला लागत असून, त्याआधीच भाजपला पराभव स्पष्ट दिसू लागला आहे, असा टोला कमलनाथ यांनी लगावला. 

कमलनाथ म्हणाले की, समोर पराभव दिसू लागल्याने भाजप दिसेल त्याला खरेदी करीत सुटला आहे. मला अनेक आमदारांचे कॉल आले असून, त्यांना भाजपकडून ऑफर आल्याचे ते सांगत आहेत. घोडेबाजाराचे राजकारण नको म्हणून मी मार्चमध्ये सत्तेतून पायउतार झालो होतो. आता पुन्हा भाजपकडून हीच खेळी सुरू आहे. याबाबत मी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. निवडणुका या योग्य वातावरणात पार पडायला हव्यात, अशी मागणी मी केली आहे. 

मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण आता पुन्हा तापू लागले आहे. राज्यात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहे. या निवडणुका 9 नोव्हेंबरला  होत आहेत. काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली आहे. राज्यातील भाजप नेत्यांना फोडून ते मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.  

जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 22 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आता राज्यात एकूण 28 मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. यातील तब्बल 16 ग्वाल्हेर भागातील आहेत. शिंदे यांच्या ग्वाल्हेर या बालेकिल्ल्यात कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले होते. मध्य प्रदेश विधानसभेचे एकूण संख्याबळ 230 असून, सध्या भाजप 107, काँग्रेस 88, अपक्ष 4, बहुजन समाज पक्ष 2 आणि समाजवादी पक्ष 1 असे संख्याबळ आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख