धक्कादायक : अभिनेत्री राकुल प्रीत सिंग गायब - actress rakul preet singh is not seen at her residence after drugs allegation | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : अभिनेत्री राकुल प्रीत सिंग गायब

वृत्तसंस्था
रविवार, 13 सप्टेंबर 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्जच्या अँगलची चौकशी एनसीबी करीत आहे. एनसीबीने रिया चक्रवर्ती हिला अटक केली असून, तिच्या चौकशीत काही अभिनेत्रींचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे.  

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिला अटक केली आहे. रियाने एनसीबीला दिलेल्या वीस पानांच्या जबाबात अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे. यात अभिनेत्री राकुल प्रीत सिंग हिचेही नाव समोर आले असून, तेव्हापासून ती गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

रियावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) कलम 8 (सी), 20 (बी), 28 आणि 29 नुसार ड्रग्जचे खरेदी, सेवन, बाळगणे आदी आरोप तिच्यावर ठेवण्यात आले आहेत. रिया ही ड्रग्ज रॅकेटची सक्रिय सदस्य असून, तिने अमली पदार्थांचे सेवन केले आहे आणि ती यातील आर्थिक व्यवहारांमध्येही सहभागी होता, असे एनसीबीने न्यायालयाला सांगितले होते.  

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली आहेत. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला आहे. एनसीबीने काही कलाकारांना या प्रकरणी नोटीस बजावली असून, यात राकुल प्रीत सिंग, सारा अली खान आणि सिमॉन खंबाटा या तीन अभिनेत्रींना चौकशीसाठी एनसीबीने समन्स बजावले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

राकुल ही बॉलीवूडपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अधिक सक्रिय आहे. या प्रकरणात तिचे नाव समोर आल्यापासून हैदराबादमधील तिच्या घरातून गायब झाल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. राकुल राहत असलेल्या इमारतीच्या रखवालदाराने दिलेल्या माहितीनुसार ती सध्या घरी नसून, चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हैदराबादच्या आजूबाजूच्या परिसरात घेली आहे. याविषयी राकुल हिच्या व्यवस्थांपकासह इतरांनी मौन धारण केले आहे. 

एनसीबी बॉलीवूडसह टॉलीवूड आणि सँडलवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खणून काढत आहे. या प्रकरणी सँडलवूडमधील अभिनेत्री रागिनी द्विवेदी हिला अटक करण्यात आली होती. आता राकुल हिचा वावर बॉलीवूडसोबत टॉलीवूडमध्येही होता. तिचे ड्रग्ज कनेक्शन उघड झाल्यास टॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेटच्या मुळापर्यंत पोचता येईल, असा एनसीबीचा कयास आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सुशांतच्या घरी काम करणाऱ्या दीपेश सावंत याला एनसीबीने आधी अटक केली होती. दीपेश हा ड्रग्जची खरेदी आणि हाताळणी करीत होता. तो सुशांतला ड्रग्ज आणून देत होता. 'एनसीबी'ने या प्रकरणात सुरुवातीला कायझेन इब्राहिम, झैद विलाट्रा, अब्बास लखानी, अब्दुल बसित परिहार यांना अटक केली आहे. हे सर्वजण ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी होते. त्यांच्याकडून अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा हे ड्रग्ज खरेदी करीत होते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख